"मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न

By राजन मगरुळकर | Published: August 6, 2023 06:10 PM2023-08-06T18:10:07+5:302023-08-06T18:12:01+5:30

मुख्य उद्घाटनापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून श्रेय वादाची लढाई अन् आगामी निवडणुकीची साखर पेरणीची संधी नेत्यांनी सोडली नाही.

"I came in the Modi wave; then how did you?"; Counter question to MP Jadhav's Bharose | "मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न

"मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न

googlenewsNext

परभणी : अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत परभणी रेल्वे स्थानक पुनर्विकासाच्या पायाभरणीचा उद्घाटन कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांच्या कलगीतुऱ्याने रंगला. मुख्य उद्घाटनापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून श्रेय वादाची लढाई अन् आगामी निवडणुकीची साखर पेरणीची संधी नेत्यांनी सोडली नाही.

भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा आढावा घेत विकास कामांसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी परभणीकडे कधीही दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले. मागील लोकसभा, विधानसभेत परभणीला अपेक्षित निधी दिला. खासदार सुद्धा मोदींच्या लाटेतच निवडून आल्याचे भरोसे म्हणाले. हाच धागा पकडून खासदार संजय जाधव यांनी भाषणातून मी जर मोदी लाटेत निवडून आलो तर तुम्ही याच लाटेत कसे काय पडलात, असा प्रतिप्रश्न भरोसे यांना केला. मोदी आमचे म्हणून तुम्ही मोदींचे महत्त्व कमी करताय, त्यांना लहान बनवू नका, ते देशाचे पंतप्रधान असून सगळ्याचे आहेत. केवळ भाजपचे आणि तुमचे नाही असे बोलून खा. जाधव यांनी भरोसे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले.

परभणी रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सकाळी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत परभणी जंक्शनच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार विफ्लव बाजोरिया, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सुनील देशमुख, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, मंगला मुदगलकर, सुप्रिया कुलकर्णी, मोकिंद खिल्लारे, अतुल सरोदे यांच्यासह नांदेड रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

बाजोरिया पिता-पुत्राच्या जोडीने वेधले लक्ष

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार विप्लव बाजोरिया हे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत वडील माजी आ. गोपीकिशन बाजोरिया हेही होते. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बराच वेळ मान्यवर व्यासपीठाच्या खाली व्हीआयपी कक्षात स्थानापन्न होते. वेळोवेळी विनंती केल्यानंतर व्यासपीठावर जाण्यासाठी गोपीकिशन बाजोरिया तयार झाले. व्यासपीठावर खा. संजय जाधव यांच्या बाजूला विप्लव बाजोरिया आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या खुर्चीवर गोपीकिशन बाजोरिया व आनंद भरोसे यांची चर्चा सुरू होती. या पिता पुत्राच्या जोडीने व चर्चेने सुद्धा अनेकांचे लक्ष वेधले होते.

खासदार मोदींच्या लाटेत निवडून आले : भरोसे

भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील चार वर्षात कलम ३७० तसेच राम मंदिर आणि आजचा हा ५०८ रेल्वे स्थानकांचा सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. परभणीसह अन्य रेल्वे स्थानकांच्या समावेशाबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांनी परभणीकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. खासदार साहेब सुद्धा मोदींच्या लाटेत निवडून आले. देशात लोकसभा आणि विधानसभेला मोदींची लाट होती असे सांगण्यासही भरोसे विसरले नाहीत.

मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो : जाधव

पूर्णा येथील विविध स्थलांतरित होणारे प्रकल्प थांबविणे आवश्यक आहे. किमान पूर्णामध्ये इलेक्ट्रिक लोको शेड व्हावा. आंध्र, दक्षिण मध्य रेल्वे विभागातील अधिकारी परभणीत सुविधा देत नाहीत, ही चुकीची बाब आहे. कंत्राटी सुद्धा ठाण मांडून आहेत. याकडे सुद्धा रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भरोसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जाधव म्हणाले, मी मोदी लाटेत निवडून आलो तर तुम्ही मोदी लाटेत कसे काय पडलात. निवडणुका येतात, जातात आता आगामी काळातही निवडणूक राहणार आहे. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. तुम्ही तुमची ताकद दाखवा. या निवडणुकीत आम्ही पडलो तर तुमची ताकद मान्य करू आणि जर आम्ही जिंकलो तर याआधी तुमची ताकद नव्हती, हे तुम्ही मान्य करा. असे म्हणून त्यांनी या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले. हे राजकीय व्यासपीठ नाही. मात्र, ओघाने तुम्ही बोललात, त्या बोलण्याला मी प्रत्युत्तर दिले. कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणून खा.जाधव यांनी मनोगत पूर्ण केले.

Web Title: "I came in the Modi wave; then how did you?"; Counter question to MP Jadhav's Bharose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.