परभणी : जिल्ह्यात मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. मात्र पहिल्याच पेपरला परभणी तालुक्यातील झरी उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गोंधळ उडाल्याची स्थिती पहायला मिळाली. ऐनवेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यात व्यवस्था करून परिक्षार्थींना पेपर सोडवावा लागला. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली.
इंग्रजीच्या पेपरने १२ वीच्या परीक्षेला सुरूवात झाली. जिल्ह्यात ७१ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाकडून तालुकानिहाय भरारी पथके, आवश्यक तेथे बैठे पथक देण्यात आले आहे. शिवाय काही केंद्रांवर पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी पहिल्याच पेपरला संबर येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र बदलले. तर दुसरीकडे जास्तीच्या विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्र निर्माण करण्यात आले.
परभणी तालुक्यात लोहगाव, बोरवण बु. पडेगाव आणि झरी हे उपकेंद्र निर्माण करण्यात आले. मात्र, ऐनवेळी झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने २०० विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. या उपकेंद्रावर वर्ग खोल्या कमी आणि विद्यार्थी संख्या अधिक झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रशासनाकडून झरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. या प्रकारामुळे पालक, विद्यार्थ्याची चांगलीच दमछाक झाली.