परभणी: शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात उभा असलेल्या विशाल आर्वीकर ( ३२) याचा चार जणांनी धारदार शस्त्र व हातोड्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना ९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वर्षा श्रीधर गिराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आर्वीकर व अन्य एक जण ठाकरे कमानीजवळ उभे होते. याच दरम्यान तोंड बांधून आलेल्या चार जणांनी दुचाकीवरून घटनास्थळी येत विशालवर अचानक हल्ला चढवला. तिघांकडे धारदार शस्त्रे व एका इसमाच्या हातात हातोडा होता. त्यांनी विशालच्या पाठीमागून वार करत त्याला खाली पाडले आणि हातोडा, चाकूने मारहाण करत गंभीर जखमी केले. बोलत उभ्या असलेल्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींपैकी एकाने त्यांना शस्त्र दाखवत दूर राहण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी विशालला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या फिर्यादीवरुरुन पोलिसांनी विक्की पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे व तुषार सावंत (सर्व रा. परभणी) या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नानलपेठ पोलीस करीत आहेत.