गंगाखेड: तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घाटेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच निराधार केला आहे. मतदान न करण्या विषयीचे निवेदन त्यांनी तहसिल कार्यालयात सादर केले आहे.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली तांडा, इनामी तांडा, केदारेश्वर तांडा, भिमला तांडा ते घाटेवाडीकडे जाणारा रस्ता पक्का नसल्याने या दिड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दगड, गोटे, माती पडली आहे. या रस्त्यावरून रहदारी करतांना ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर सर्वत्र चिखलच चिखल होत असल्याने येथून मार्ग शोधतांना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. आजारी रुग्ण, लहान बालक, वृद्ध व गरोदर मातांचे अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.
राणीसावरगाव ते घाटेवाडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन रस्त्याचे मजबुती व डांबरीकरण करण्याची मागणी केल्यानंतर ही या रस्त्याचे काम काही झाले नाही. तसेच निवडणुकी दरम्यान गावात मत मागण्यासाठी येणाऱ्या पुढाऱ्यांनीही केवळ आश्वासनेच दिली. यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी गावातून जागर दिंडी काढत ग्राम पंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी गंगाखेड येथील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी निवेदन सादर केले. यावर सोपानराव नागरगोजे, बालासाहेब चव्हाण, पांडुरंग राठोड, शरद कांगणे, तुकाराम नागरगोजे, प्रभू राठोड, राहुल कांगणे, भगवान राठोड, लक्ष्मीबाई नागरगोजे, कमलबाई राठोड, जयश्री चव्हाण, छबुबाई राठोड, प्रभाकर आडे, शिवाजी राठोड, सुनिता चव्हाण, गंगाधर आडे, सविता चव्हाण, संजय राठोड, कमलबाई पवार, अहिल्याबाई कांगणे, शहाजी नागरगोजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.