खड्ड्यांमुळे वाढले अपघात
परभणी : जिल्ह्यात सर्वच मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जिंतूर, वसमत, पाथरी आणि गंगाखेड रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणीच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्ता वाहतुकीयोग्य नाही. परिणामी अपघात वाढले आहेत.
दारूची अवैध विक्री
परभणी : संचारबंदी काळातही जिल्ह्यात दारूची अवैध विक्री होत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. पोलीस प्रशासनाकडून याविरुद्ध कारवाया केल्या जात आहेत. मात्र, या अवैध दारू विक्रीला पूर्णत: लगाम लागलेला नाही. उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात सुविधांचा अभाव
परभणी : शहरात मूलभूत समस्या वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्ते, पाणी आणि विजेच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
चौकातील वाहतूक धोकादायक
परभणी : येथील महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळा परिसरात चौकाची आखणी केली नसल्याने या भागातील वाहतूक धोकादायक ठरत आहे. चारही बाजूंनी येणारी वाहने या चौकात एकत्र येतात. भरधाव वेगाने वाहने या चौकात येत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मनपाने चौक उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
पथदिवे दिवसाही सुरूच
परभणी : शहरातील अनेक भागांत दिवसाही पथदिवे सुरू ठेवले जात आहेत. मनपाच्या विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत आहे. येथील सुपर मार्केट परिसरात शनिवारी पथदिवे दिवसाही सुरूच ठेवण्यात आले होते. मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.