परभणी : जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गुळाचा ढेपीमध्ये लपवून ठेवलेली ७९ हजार रुपयांची विदेशी दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १३ एप्रिल रोजी दुपारी जप्त केली आहे.
जिंतूर तालुक्यात अवैधरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या दारू विक्रीची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी १३ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मालेगाव तांडा येथे कारवाई केली. यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये गुळाच्या ढेपीमध्ये दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ११ बॉक्स जप्त केले. त्यामध्ये विदेशी दारूच्या ५२८ बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेला दारूची किंमत ७९ हजार २०० रुपये एवढी आहे. याप्रकरणी अमोल आडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्यासह उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींनी केली.