परभणी : शहरातील रहमत नगर भागात चप्पल आणि बुटाच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. यामध्ये सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
रहमत नगर खोजा जमात खाना समोर इस्माईल बागवान यांच्या चप्पल व बुटाच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाला मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास अब्दुल अलीम यांनी कळविली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्र अधिकारी डी. यू. राठोड पथकातील कर्मचारी उमेश कदम, निखिल बेंडसुरे, मदन जाधव, वसीम अखिल अहमद हे रवाना झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी या यंत्रणेने सुमारे एक तास प्रयत्न केले. मात्र, अग्निशमनच्या एका बंबाने ही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुसरे वाहन येथे बोलवावे लागले. अक्षय पांढरे, समी सिद्दीकी हे तेथे पोहोचले. दोन अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने चार बंब पाणी वापरून कसरत करून आग आटोक्यात आणावी लागली. संपूर्णपणे आग आटोक्यात आणण्यास साडेतीन तासांचा कालावधी अग्निशमन दलाच्या जवानांना लागला. यामध्ये चप्पल, बूट आणि आंब्याचे कॅरेट जळून खाक झाले. साधारणपणे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजते.