जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढली अस्वच्छता
परभणी : जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नद्या प्रवाही असल्याने काही प्रमाणात प्रदूषण कमी झाले होते. मात्र, नदीपात्रातील पाणी कमी झाले असून, गाव परिसरातील कचरा, तसेच टाकाऊ वस्तू नदीपात्रात फेकल्या जातात. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. शिवाय अवैध वाळू उपशामुळे नद्यांना डबक्याचे स्वरूप आले असून, पाणी प्रदूषित झाले आहे.
टरबूज, खरबुजांची वाढली आवक
परभणी : उन्हाळ्याला प्रारंभ होताच टरबूज आणि खरबुजांना मोठी मागणी वाढते. येथील बाजारपेठेतही टरबुजांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे, द्राक्षे, चिकू या फळांचीही आवक वाढली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात चिकूची लागवड केली जात असून, उत्पादित माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बसपोर्टचे काम गतीने सुरू
परभणी : येथील बस स्थानक भागात बसपोर्टचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांपासून बिलाअभावी हे काम ठप्प पडले होते. त्यामुळे बसपोर्टची उभारणी वेळेत होते की नाही, अशी शंका प्रवाशांत व्यक्त केली जात होती. मात्र, महामंडळ प्रशासनाने कंत्राटदाराचे बिल अदा केल्याने आता हे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने निधी अभावी काम बंद पडू नये, यासाठी आधीच निधीची तरतूद करुन ठेवावी, अशी जिल्हावासीयांची मागणी आहे.
जिल्हा स्टेडियममधील स्वच्छतागृह बंद
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृह बंद असल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. स्टेडियम परिसरात अद्ययावत असे स्वच्छतागृह उभारण्यात आले. मात्र, या स्वच्छतागृहाची देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्टेडियम भागातील स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी खेळाडूंतून केली जात आहे.
रब्बीचा शेतमाल घरातच पडून
परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतमाल सध्या तरी घरातच पडून आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्याने, त्याचा परिणाम बाजार समितीच्या कारभारावर झाला आहे. बाजार समिती भागात मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणी सहन कराव्या लागत आहेत.