पाथरी (जि. परभणी) : पती-पत्नीतील वादातून पतीने संगणकीय प्रणालीचा वापर करून पत्नीच्या नावाने फेक ई-मेल आयडी तयार करून तिच्या घरी अश्लील वस्तूंचे पार्सल पाठविल्याचा प्रकार पाथरीत उघडकीस आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती सचिन किशनराव खिस्ते (रा. गोलाईत नगर, पाथरी) याने बनावट ई-मेल आयडी तयार करून फिर्यादी व तिच्या भावाच्या नावाने अश्लील प्रॉडक्ट्स घरी पाठविले. फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचे पटत नसल्याने ते वेगळे राहतात. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी भा.दं.वि. कलम ३३६ (४) बीएनएस २०२३ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.