इंद्रायणी नदीतून डाव्या कालव्याचे पाणी नृसिंह पोखर्णी येथून गोदावरी नदीपात्रात येते. धारखेड, मुळी येथील ग्रामस्थांना जाण्यासाठी सोयीचा असलेला हा मातीचा कच्चा बंधारा नगरपालिका पाणीपुरवठा इंधन विहिरीला पाणी येण्यासाठी बांधलेला आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी मातीचा कच्चा बंधारा तयार करण्यात येतो. दीड महिन्यापूर्वी गंगाखेड शहरालगत असलेला मातीचा बंधारा फोडून पाणीसाठा केला जातो. यालाच बंधारा पुलाच्या कामामुळे फुटल्याचे रूप दिले.
त्यामुळे नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यात इंद्रायणी नदीतून गोदावरी नदीला पाणी आल्याने या तळतुंब घाटावर उभारण्यात आलेल्या कच्च्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ऊर्ध्वगतीने पाठीमागे साठा झाल्याने वाळूपट्टा पूर्णपणे पाण्यात गेला आहे. हे पाणी वाळूपट्ट्यात आल्याने वाळूमाफियांना वाळूउपसा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचा या बंधाऱ्यावर डोळा आहे. त्यामुळे वाळूमाफियांचा कुटिल डावपेच ओळखून बंधारा फोडण्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महसूल प्रशासन, नगरपालिका, पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बंधाऱ्याच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक आहे.