परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील राजकीय नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेचा विषय झालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल २३ मार्च रोजी जाहीर झाला. यात काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलला २१ पैकी ११, तर भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलला ९ जागा मिळाल्या. एका जागेवर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे हे अपक्ष म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्षपदावर डोळा ठेवून वरपूडकरांची साथ साेडली व बोर्डीकर गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. बोर्डीकर गटालाही समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे दुर्राणी यांनी निकालाच्या दिवशीच आम्हाला कोणी गृहित धरू नये, असे सांगून बोर्डीकर गटासोबतही राहण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे निकालानंतर दुपारी पाथरी येथे आ. दुर्राणी यांच्या निवासस्थानी भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी भेट दिली. यावेळी वरपूडकर गटातील माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत असलेला या तिन्ही नेत्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोनपेठमध्ये विटेकरांच्या विरोधात बोर्डीकर गटाकडून त्यांचे भाऊ गंगाधरराव बोर्डीकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली. एका मताने विटेकर विजयी झाले. मतदानाच्या दिवशी या केंद्रावर दोन्ही गटांत हाणामारी झाली, वाहनांची तोडफोड झाली आणि निकाल लागल्यानंतर आ. दुर्राणी, आ. मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत विटेकरांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरपूडकर गटाची अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले. नंतर विटेकरांनी खाजगीत आपण वरपूडकर गटाकडेच असल्याचे सांगून विरोधकांनी चुकीच्या हेतूने हा फोटो व्हायरल केल्याचे सांगितले. त्यामुळे वरपूडकर गटाचा जीव भांड्यात पडला. असे असले तरी पालमचे रोकडे हे भाजपचे असल्याने आपल्याकडेच आहेत. वरपूडकर गटाकडील पूर्णेचे बालाजी देसाई हे ही भाजपचे असल्याने आपल्याकडे येतील, असे या गटास वाटते. यातूनच त्यांना चमत्काराची अपेक्षा वाटत आहे. वरपूडकर गटातील माजी आ. सुरेश देशमुख यांनी मात्र आपल्याकडे १२ सदस्यांचे बळ असल्याने पुन्हा बँक आपल्याच गटाच्या ताब्यात राहणार असल्याचा दावा केला आहे; परंतु पडद्यामागून घडणाऱ्या घडामोडींनी व काठावरील निकालाने दोन्ही गटांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.
दुर्राणी यांचा अध्यक्षपदावर डोळा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी प्रारंभी भाजपच्या पॅनलमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला, त्यावेळी सहकारात पक्ष नसतो, असे विधान केले होते. निकालानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादीचे ४ सदस्य निवडून आले आहेत. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे सांगितले, तसेच राष्ट्रवादीला अध्यक्षपद जो देईल त्या गटाला आपला पाठिंबा राहील, असे सांगून दुर्राणी यांनी आपले इरादे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत. आता निवडून आलेल्या चार सदस्यांपैकी स्वत: आ. दुर्राणी आणि त्यांचे समर्थक दत्तात्रय मायंदळे हे दोन सदस्य एकत्र आहेत, तर सोनपेठचे राजेश विटेकर हे बोर्डीकरांकडे जातील याची सुतराम शक्यता नाही. वसमतमध्ये राष्ट्रवादीचा मुख्य शत्रू भाजपच आहे. त्यामुळे येथून निवडून आलेले आ. राजू नवघरे हेही भाजपच्या गोटात अध्यक्षपदासाठी जातील, याचीही शक्यता धूसरच आहे.