परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी एकाच दिवशी ८ जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. दररोज ५ ते ६ रुग्णांचा मृत्यू होत आहे. २७ मार्च रोजी शासकीय रुग्णालयात उपचार घेणारी एक महिला आणि ४ पुरुष तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे ३ पुरुष अशा एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.
आरोग्य विभागाला शनिवारी १ हजार ६४३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार १६ अहवालांमध्ये ६७ आणि रॅपिड अँटिजन टेस्टच्या ६२७ अहवालांमध्ये १७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता १२ हजार ५०४ झाली असून, त्यापैकी १० हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३८३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या १ हजार ३८२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील खासगी रुग्णालयात २६९ रुग्ण उपचार घेत आहेत. ९७९ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
११६ रुग्णांची कोरोनावर मात
शनिवारी २४६ रुग्णांची भर पडली असली तरी ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे या रुग्णांना आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.