अभियंत्याअभावी जलजीवन मिशनची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:16 AM2021-03-06T04:16:48+5:302021-03-06T04:16:48+5:30

जिंतूर : जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिला ५५ लीटर पिण्याचे पाणी देण्याची योजना आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाला ...

Due to lack of engineers, the work of Jaljivan Mission was delayed | अभियंत्याअभावी जलजीवन मिशनची कामे खोळंबली

अभियंत्याअभावी जलजीवन मिशनची कामे खोळंबली

Next

जिंतूर : जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तिला ५५ लीटर पिण्याचे पाणी देण्याची योजना आहे. मात्र, पाणी पुरवठा विभागाला उपविभागीय अभियंता नसल्याने ही योजना रखडली असून, अनेक गावातील जलजीवन मिशनचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत.

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बहुतांश योजना कालबाह्य झाल्या आहेत. ज्या गावांमध्ये योजना कालबाह्य झाल्या. त्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून नवीन योजना घेऊन प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पिण्यायोग्य पाणी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या योजनेअंतर्गतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करायचे आहेत. या योजनेअंतर्गत तालुक्यातील १७० गावांपैकी जवळपास १३५ ते १४० गावांमध्ये या योजनेचे प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. भारत निर्माण योजना, स्वजलधारा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जीवन प्राधिकरण योजना याअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या योजना एक तर अपूर्ण आहेत किंवा त्या कालबाह्य झाल्या आहेत. याशिवाय ग्रामपातळीवर असणाऱ्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे १० वर्षांपूर्वीच्या योजनेतून प्रतिव्यक्ती ३० ते ३५ लीटर पाणी दिले जात होते. परंतु, आता प्रतिमाणसी ५५ लीटर पाणी देण्यात यावे, यासाठी जलजीवन योजना आणली. या योजनेअंतर्गत गावागावात करावयाच्या कामांची अंदाजपत्रके जिंतूर उपविभागातील उपविभागीय अभियंता व संबंधित अभियंत्यांना करावयाची आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या विभागाला पूर्णवेळ अभियंता नाही. एस. व्ही. देशमुख या अभियंत्यांकडे उपविभागीय अभियंत्याचा पदभार आहे. ते वैद्यकीय रजा टाकून २२ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर निघून गेले आहेत. बालाजी पाटील यांची जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता म्हणून नियुक्ती, तर शेषराव घुगे यांची जिंतूर पंचायत समितीला अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील हे दोन अभियंते निघून गेले. तसेच देशमुख यांचीही बदली पाथरी येथे झाली आहे. परंतु, त्यांच्या बदलीच्या आदेशात पर्यायी व्यक्ती आल्यानंतरच पदभार सोडावा, असे स्पष्ट असताना देशमुख मात्र वैद्यकीय रजेवर गेले ते आलेच नाहीत. परिणामी मनरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता तसेच पंधराव्या व सोळाव्या वित्त आयोगातील पाणीपुरवठ्याच्या कामांना मंजुरी आदी कामे खोळंबली आहेत. सध्या पाणी पुरवठा विभागाला आष्टीकर हे केवळ कंत्राटी अभियंते आहेत. त्यांच्याकडे १७० गावाचा कारभार आहे.

या गावातील अंदाजपत्रके रखडली

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील तेलवाडी, चितनरवाडी, धोपटवाडी, देवसडी, गारखेडा, शेख, मालेगाव दुधना, नांदगाव दुधना, भोशी, सावरगाव तांडा, भिलज आदी गावातील प्रस्ताव तातडीने सादर करणेबाबत आदेशित केल्यानंतरही या गावातील प्रस्ताव रखडलेल्या अवस्थेत आहेत. उपविभागीय अभियंता नसल्याने पाणीपुरवठा विभागाची कामे रेंगाळली आहेत.

Web Title: Due to lack of engineers, the work of Jaljivan Mission was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.