मागणी ६० लाखांची, मिळाले २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:29+5:302021-02-23T04:25:29+5:30

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; ...

Demand of 60 lakhs, got 25 lakhs | मागणी ६० लाखांची, मिळाले २५ लाख

मागणी ६० लाखांची, मिळाले २५ लाख

Next

परभणी : शहरात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे ठप्प पडलेले काम सुरू करण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने ६० लाखांची मागणी केली; मात्र एस.टी. महामंडळाने केवळ २५ लाख रुपयांचा निधीच वितरित केल्याने हे काम पुढे सरकण्याची शक्यता मावळली आहे.

एस.टी. महामंडळाच्या बसस्थानकांना अद्ययावत करण्याच्या उद्देशाने तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून परभणी येथे अद्ययावत बसपोर्ट मंजूर झाले. यासाठी १३ कोटी ४ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आता वेळेत बसपोर्टचे काम होणार? असल्याची आशा परभणीकरांना निर्माण झाली. बसस्थानकाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी बसपोर्टच्या कामाला सुरुवातही झाली. सध्या अर्धवट अवस्थेत हे काम आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले. मात्र त्यानंतर पुढील काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे ६० लाख रुपयांचे देयक अदा करावे, अशी मागणी केली. कंत्राटदाराच्या मागणी प्रमाणे स्थानिक प्रशासनाने एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे या देयकाची मागणी नोंदविली. चार महिन्यानंतर एस.टी. महामंडळ प्रशासनाने केवळ २५ लाख रुपये निधी वितरित केला आहे. त्यामुळे एवढ्या धिम्या गतीने निधीचे वितरण होत असेल तर काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे, विशेष म्हणजे, काम पूर्ण करण्याची मुदत उलटून गेली आहे. तरी देखील केवळ प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बसपोर्टचे काम सध्या ठप्प आहे. हे काम कधी सुरू होणार? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

असे आहे संकल्पित बसपोर्ट

परभणी येथे उभारण्यात येणारे संकल्पित बसपोर्ट अद्ययावत असे आहे.१८प्लॅटफार्म याठिकाणी तयार केले जाणार असून, ३६४४ चौरस मीटर क्षेत्रावर बसपोर्टचे बांधकाम होणार आहे. अद्ययावत असे प्रतीक्षालय, आरक्षण कक्ष, ए.टी.एम. केंद्र, नियंत्रण कार्यालय, वाहनतळ अशा सर्व सुविधांनीयुक्त असलेले बसपोर्ट उभारण्याचा हा प्रकल्प आहे;मात्र त्यासाठी वेळेत निधी उपलब्ध होत नसल्याने सध्या काम थांबले आहे.

जुनी इमारत पाडल्याने गैरसोय

बसपोर्टची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी असलेली बसस्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शहरात तात्पुरत्या जागेत बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे जागाही अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे बसपोर्ट उभारणीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने प्रवाशांना अशी गैरसोय आणखी किती वर्षे सहन करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Demand of 60 lakhs, got 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.