पूर्णा : पांगरा रस्त्यावरील कोविड सेंटर लवकरच एक्स्प्रेस वीज फिडरशी जोडण्यात येणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खा. संजय जाधव यांच्या प्रयत्नाने आता कोविड सेंटरची विजेची अडचण कायमस्वरूपी दूर होणार आहे.
पूर्णा तालुक्यात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी उपलब्ध वीजपुरवठा ग्रामीण वीज फिडरवरून आहे. ग्रामीण भागात विजेचे लोडशेडिंग असल्याने त्याचा फटका या कोविड सेंटरला बसत आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत होता. याबाबतची अडचण काही समाजसेवकांनी खा. संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्याकडे दूरध्वनीवरून व्यक्त केली. अडचणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी खा. जाधव यांनी याबाबत पाठपुराठा केला. स्वतः परभणी येथील वीज कार्यालयात हजर होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्णेची अडचण निदर्शनास आणून दिली. कोविड सेंटरला एक्स्प्रेस फिडर बसविल्यास येथील गैरसोय कायमची दूर होईल, असा उपाय सुचविला. अधिकाऱ्यांनी सद्य:परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच काम हाती घेऊ, असे सांगितले. त्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
खा. संजय जाधव, विशाल कदम यांनी कोरोना रुग्णांची अडचण तत्परतेने लक्षात घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.