परभणी : जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी कोरोनावर उपचार घेणाऱ्या १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील एक आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज १५ ते २० रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नव्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. सोमवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयातील १० आणि खासगी रुग्णालयातील ५ अशा १५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला बुधवारी १ हजार २२३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ४३४ अहवालांमध्ये २२६ आणि रॅपिड ॲंटीजेन टेस्टच्या ७८९ अहवालांमध्ये ३०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार १२२ झाली असून, त्यातील १६ हजार ६० रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ४ हजार ५१८ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात ६७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५३, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२५, अक्षदा मंगल कार्यालयात १२९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ४२५ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कोरोनामुक्तीचा वाढला दर
मागील दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज ३०० ते ४०० रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. सोमवारी ४०० रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.