पूर्णा (जि. परभणी) : पूर्णा शहराजवळ विजपुरवठा सुरळीत करताना महावितरणचे बाह्यस्रोत कर्मचारी विशाल जोगदंड यांचा मृत्यू झाला. यामुळे मयताच्या नातेवाईकांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह खाली उतरवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान सोमवारी पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पूर्णा ग्रामिण रुग्णालयात छावणीचे स्वरूप आले होते.
पूर्णा शहराजवळील बसस्थानक फिडरवर बाह्यस्रोत कर्मचारी विशाल जोगदंड हे रविवारी सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत करत होते. दरम्यान अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विशाल जोगदंड यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृत विशाल जोगदंड यांच्या नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करेपर्यंत मृतदेह खाली उतरवणार नसल्याचा पवित्रा घेतला. यादरम्यान महावितरणच्या अभियंत्यालाही जमावाकडून धक्काबुक्की कण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, सोमवारी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात आणला असता नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने पुन्हा परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. ही बाब लक्षात घेत पूर्णा, चुडावा, ताडकळस पोलीस ठाण्याचा फौजफाटा तैनात करण्यात आला. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर दुपारी उशीरा शवविच्छेदन करण्यात आले. विशाल जोगदंड त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.