मानवत: तालुक्यातील वांगी येथे आपल्या घरातच ३५ वर्षीय महिला मृत अवस्थेत आढळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि. ६ ) पहाटे उघडकीस आली. अनुसया रामा वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे. हा प्रकार घात की अपघाताचा आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
मूळचे रायगड जिल्ह्यातील वाघमारे कुटुंब सध्या मानवत तालुक्यातील वांगी येथे वास्तव्यास आहे. अनुसया वाघमारे या आपल्या पतीसह गावात झोपडीत राहत. मोलमजुरी करून हे कुटुंब आपली उपजीविका भागवत होते. दरम्यान, आज पहाटे अनुसया वाघमारे या आपल्या झोपडीत मृत असल्याचे पतीस आढळून आले. त्याने आरडाओरडा केल्याने शेजारी जागी झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, माहिती मिळताच सपोनि शिवानंद स्वामी, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, अनिल खिल्लारे, प्रमोद देवकते, पोलीस कर्मचारी पोलीस वाघ, सिद्धेश्वर पाळवदे, शरीफ पठाण पठाण, शेख मुखेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
भांडणाची किनारया घटनेला पती-पत्नीच्या भांडणाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.