परभणी : मागील काही दिवसांत लॉकडाऊन लागल्यापासून रक्तदान शिबिरास खीळ बसली असून, जिल्ह्यातील शासकीय व खासगी रक्तपेढ्यांकडे दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तपेढ्या ऑक्सिजनवर आल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिरांना ब्रेक लागला आहे. त्यानंतर काही युवकांनी ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करण्याची मोहीम चालविली. मात्र, २४ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या मोहिमेसही खीळ बसली आहे. आज घडीला जवळपास जिल्ह्यातील खासगी रक्तपेढ्यांसह शासकीय रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
शासकीय रक्तपेढीत ७७ पिशव्या शिल्लक
जिल्ह्यात लॉकडाऊन व लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे रक्ताचा पुरवठा निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत सध्या केवळ ७७ रक्तपिशव्या शिल्लक आहेत. हा साठा दोन दिवसांपुरताच आहे. त्यामुळे रक्तदान करण्यास रक्तदाते पुढे आले नाही, तर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे..
न्यू लाईफ ब्लड बँक परभणी
शहरातील न्यू लाईफ या खासगी ब्लड बँकेत दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शासकीय रक्तपेढीबराेबरच खासगी रक्तपेढ्यांमध्येही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे युवकांनी रक्तदान शिबिरे घेण्यास पुढे यावे, असे आवाहन न्यू लाईफ ब्लड बँकेचे पंकज खेडकर यांनी केले आहे.
हुजूर साहीब ब्लड बँक
जिल्ह्यात कोरेानाचा शिरकाव झाल्यापासून रक्त संकलनावर परिणाम झाला आहे. मात्र, मागील काही महिन्यांत रक्तदात्यांनी ठिकठिकाणी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करून रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ३० ते ४० बॅगचे संकलन व्हायचे. मात्र,श आता लसीकरण सुरू झाल्यापासून रक्तदान चळवळ थांबली आहे. त्यामुळे युवकांनी स्वत:हून पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन हुजूर साहीब ब्लड बँकेचे ज्ञानेश्वर खटींग यांनी केले आहे.
लसीकरणाआधी करा रक्तदान...
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ज्यांनी लस घेतली आहे, अशांना २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत परभणी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी लसीकरणाआधीच रक्तदान करणे गरजेचे आहे.