परभणी : फेसबुक अकाउण्ट हॅक करून त्यावरून पैशांची मागणी करण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. तशा तक्रारीही सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत.
सोशल मीडियाचा वापर वाढल्यानंतर आता या मीडियाचा दुरूपयोग करून फसवणुकीचे प्रकार मागील काही वर्षांपासून होत आहेत. सुरुवातीच्या काळात मोबाइलवर फोन करून एटीएम कार्डचा पासवर्ड, बँकेची माहिती मागवून परस्पर पैसे लाटल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे मोबाइल नंबर हॅक करून त्यावरूनही पैसे ऑनलाइन अकाउण्टच्या साह्याने बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून फेसबुक अकाउण्ट हॅक करून किंवा त्याच नावाचे नवीन अकाउण्ट तयार करून त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार वाढला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडे तक्रारीही दाखल झाल्या असून, हॅक केलेले फेसबुक अकाउण्ट बंद करून उपाययोजना केल्या जात आहे; परंतु आपल्या फेसबुक अकाउण्टवरून पैशांची मागणी होत असेल तर नागरिकांनी वेळीच सावध राहून उपायोजना करणे गरजेचे झाले आहे.
परिचयातील व्यक्तींच्या नावाचा वापर
फेसबुक अकाउण्टवरील प्रोफाइल सर्वांना पाहता येत असल्याने या अकाउण्टमधील फ्रेण्ड लिस्टमधील परिचयाच्या व्यक्तींच्या नावाचा वापर करून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.
फेसबुक अकाउण्टवरील प्रोफाइलचा फोटो वापरून त्याच नावाने दुसरे अकाउण्ट तयार करून त्या अकाउण्टवरून पैसे मागण्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत फेसबुक अकाउण्टच्या साह्याने पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे दाखल आहेत. या तक्रारीनंतर संबंध अकाउण्ट बंद केले जाते; परंतु नागरिकांनीच याविषयी काळजी घेण्याची गरज आहे.
..अशी घ्या काळजी
फेसबुक अकाउण्ट वापरकर्त्यांनी प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन केवळ मित्रांनाच प्रोफाइल दिसेल, अशा पद्धतीने सेटिंग करावी. तसेच प्रोफाइलला पासवर्ड वापरावा. अकाउण्ट हॅक झाल्याचे लक्षात येताच हे अकाउण्ट बंद करावे.