मातृवंदना योजनेत ८२२ महिलांना दिला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:06+5:302021-02-05T06:03:06+5:30

देशात महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. त्याप्रमाणे प्रसूतीनंतर देखील स्त्रियांना तात्काळ कामावर जावे लागते. यामुळे अशा ...

Benefits given to 822 women in Matruvandana Yojana | मातृवंदना योजनेत ८२२ महिलांना दिला लाभ

मातृवंदना योजनेत ८२२ महिलांना दिला लाभ

देशात महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. त्याप्रमाणे प्रसूतीनंतर देखील स्त्रियांना तात्काळ कामावर जावे लागते. यामुळे अशा माता व नवजात बालके कुपोषित राहण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत केंद्र शासनाच्या ६० टक्के तर राज्य शासनाच्या ४० टक्के वाटा आहे. ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी आहे. या योजनेंतर्गत ५ हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्यात येते. मानवत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय त्याप्रमाणे कोल्हा व रामपुरी या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातून ही योजना राबविण्यात येते. यात २८५ स्त्रियांना पहिल्या टप्प्याचे २ लाख ८५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्याचे ३४४ स्त्रियांना ६ लाख ८८ हजार, तर तिसऱ्या टप्प्याचे १९३ स्त्रियांना ३ लाख ८६ हजार रुपये अनुदान वितरण करण्यात आले. एकूण ८२२ स्त्रियांना १३ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान वितरण करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटात देखील शासनाकडून या योजनेत वेळेवर अनुदान वाटप केले जात आहे.

तीन टप्प्यांत दिले जाते अनुदान

या योजनेत तीन टप्प्यांत एकूण पाच हजारांचे अनुदान मिळते. पहिल्या टप्प्यात गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर एक हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात बाळंतपूर्व तपासणी केल्यानंतर दोन हजार रुपये, या योजनेतील तिसरा आणि शेवटचा टप्प्यात दोन हजार रुपये बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो.

Web Title: Benefits given to 822 women in Matruvandana Yojana