परभणी : मे महिन्यातील २५ दिवसांत दररोज सरासरी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण ३०४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने या महिन्यातही कोरोना संसर्गाने जिल्हावासीयांना चांगलेच जेरीस आणले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने थोडीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. एप्रिल महिन्यात २२ हजार ५७८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मे महिन्याच्या २५ दिवसांत ११ हजार ८३६ रुग्णांची नोंद झाली असून, ३०४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबबरोबर मृत्यूचे प्रमाणही अल्पप्रमाणात घटले आहे.
२५ ते १८ मे या आठवड्यात २ हजार ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापूवीच्या १८ ते ११ मे या आठवड्यात २ हजार ७६८ रुग्ण नोंद झाले होते, तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत बाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचेच संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात संसर्ग कमी होत असल्याने ही समाधानाची बाब ठरत असली, तरी नागरिकांना अजूनही प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स या नियमांचा आणखी कटाक्षाने अवलंब केला, तरच कोरोनावर लवकर मात करणे शक्य होणार आहे,
८९ टक्क्यांवर पोहोचले बरे होण्याचे प्रमाण
जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दरही मे महिन्यात वाढला आहे. मागच्या २५ दिवसांमध्ये ११ हजार ८३६ नवीन रुग्ण नोंद झाले असून, १५ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. चालू आठवड्यात मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. ११ ते १८ मे या आठवड्यात ५ हजार २५९ रुग्ण बरे झाले होते. मात्र १८ ते २५ मे या आठवड्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ १ हजार २५३ एवढीच आहे.
मूृत्यूचा दर २.४५ टक्क्यांवर
जिल्ह्यात मे महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर घटलेला नाही. २५ मे रोजी २ रुग्णांचा झालेला मृत्यू हा अपवाद वगळता आतापर्यंत सरासरी दररोज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. १ मे रोजी जिल्ह्यात मृत्यूचा दर २.४२ होता. तो आता २.४५ वर पोहोचला आहे.
एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधित : २२५७८
एप्रिल महिन्यातील रुग्णांचे मृत्यू : ४८५
मे महिन्यातील कोरोनाबाधित : ११८३६
मे महिन्यातील एकूण मृत्यू : ३०४