- विठ्ठल भिसेपाथरी : पैशाच्या देवाण-घेवानीतून अनंत टोम्पे यांचा अमानुष मारहाण करून खून करण्यात आला. मोल मजुरी करून खाणारे हे कुटुंब आता उघड्या वर पडले आहे. टोम्पे यांची पत्नी आणि पाच लहान मुली यांना कोणाचा आधार उरला नाही. टोम्पे घरची परिस्थिती पाहून शहरातील काही जागरूक नागरिकांनी मदतीची भूमिका घेऊन १८ एप्रिल रोजी राममंदिरात बैठक घेतली. यात टोम्पे कुटुंबासाठी १ लाख रुपये आर्थिक मदत जमा झाली आहे.
पाथरी येथील वैष्णवी गल्लीमध्ये काही दिवसापासून वास्तव्यास राहणाऱ्या अनंता टोम्पे हे व्यवसायाने वाहन चालक होते. पाथरी येथील काही खाजगी वाहनासोबतच त्यांनी मानवत येथेही वाहन चालक म्हणून काम केले. किरायच्या घरात राहणाऱ्या टोम्पे कुटुंबात पत्नी आणि पाच मुली आहेत. अनंत टोपे हे चालक म्हणून तर त्यांची पत्नी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु, पैशाच्या देवाण-घेणीच्या वादावरून अनंत टोम्पे यांची अमानुष मारहाण करून १५ एप्रिल रोजी हत्या झाली. या प्रकरणी ६ आरोपींना अटक ही करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर टोम्पे यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
दरम्यान, शहरातील काही जागरूक नागरिकांनी टोम्पे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील राम मंदिर येथे बैठक आयोजित केली. यात टोम्पे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात म्हणून १ लाख रुपये जमा झाले. हा निधी टोम्पे यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पाथरीत मूक मोर्चाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आहे.