परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने शासनदरबारी ही मागणी लावून धरली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे संघर्ष समितीचे संयोजक माजी आ. विजयराव गव्हाणे, आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघना बोर्डीकर, खा. फौजिया खान, खा. बंडू जाधव, सुनील भोंबे, मुन्ना पारवे, रामेश्वर शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यामध्ये २००९ पासून परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्य शासनाच्या एका समितीने सकारात्मक अहवालही सादर केला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत किरकोळ बदल केल्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचे कामकाज सुरू करणे शक्य आहे. येथे २०१६-१७ मध्ये येथील बाह्य व अंतर रुग्णसंख्या ४ लाख ६८ हजार ४९८ तर २०१७-१८ मध्ये २ लाख ७६ हजार ९७२ होती. जिल्हा रुग्णालय परिसर ४० हजार ४७९ चौरस मीटरचा असून २० हजार ३३२ स्क्वेअर मीटरवर बांधकाम आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या ४०३, अस्थिव्यंग विद्यालयाच्या ५० व स्त्री रुग्णालयाच्या ६० अशा एकूण ५१३ खाटा उपलब्ध आहेत. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास ही बाब सुयोग्य आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शरद पवार, अजित पवार, अमित देशमुख यांची सकारात्मकता
यावेळी शरद पवार यांनी सकारात्मकता दर्शवित आपण सर्व अजितदादांना भेटा, मी त्यांना सांगतो. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मी स्वत: तुमच्यासोबत येतो, असे सांगितले. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, असे आपलेही मत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही भेट घेतली. त्यांनीही वैद्यकीय सचिवांना तात्काळ परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना महाविद्यालयाच्या जागेचा सातबारा हस्तांतरणाविषयी पत्र पाठविण्याचे आदेश दिले. लवकरात लवकर परभणीत हे महाविद्यालये कार्यान्वित करण्याचे प्रयत्न केले जातील, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनीही यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली.