पालम : तालुक्यातील शिरपूर ते केरवाडी या रस्त्यावर गावातून वसुली करून पालमकडे येणाऱ्या फायनान्स कंपनीच्या एजंटला २ जणांनी दुचाकी आडवी लावून मारहाण करीत लुटल्याची घटना मंगळवारी ( दि.९ ) दुपारी १२ च्या सुमारास घडली. जखमी एजंटवर नांदेड येथे उपचारसाठी पाठविण्यात आले आहे.
अजय चंदू नागुवड ( २० ) हा 'ग्रामीण कुटा' या फायनान्स कंपनीत काम करतो. कंपनी ग्रामीण भागात कर्ज वाटप करते. अजय नेहमीप्रमाणे शिरपूर व परिसरात कर्ज वसुलीचा हप्ता संकलनासाठी मंगळवारी सकाळी गेला होता. वसुलीनंतर केरवाडीमार्गे पालमकडे तो परत निघाला. दरम्यान, अर्धा रस्त्यात बाईकवरून आलेल्या दोन जणांनी त्याचा रस्ता आडवला. यानंतर दोघांनी जबर मारहाण करत त्याच्या जवळील ५० ते ६० हजार रूपये घेऊन पोबरा केला आहे. गंभीर जखमी अजयला प्रवास्यांनी पालमच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची पोलीसात अद्याप नोंद करण्यात आली नव्हती.