कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्हाभरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात किराणा दुकानेही बंद राहिली. शासनाच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार सोमवारपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असली तरी सोमवारी मात्र बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यात गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रमजान ईद, महावीर जयंती आदी सण आणि उत्सव असून, या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे राज्यभरात येत्या काही दिवसात लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे देखील ग्राहक बाजारपेठेत मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे दिसून आले. शहरातील स्टेशन रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्ची बाजार, जनता मार्केट या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या भागात सोमवारी दिवसभरात अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली.
दोन दिवसांच्या निर्बंधानंतर बाजारपेठ फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST