कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी गंगाखेड नगर परिषदेच्या वतीने व्यापार पेठेत विनामस्क फिरत सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, कार्यालयीन अधीक्षक मो. अफजलोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी हजारे, चंद्रकांत पाठक, अंजना बिडगर, अमोल जगतकर, भगवान जंगले, शिवशंकर वाघमारे, सुधीर गायकवाड, माऊली पारसेवार, जयमाला हजारे, संजय यादव, प्रभा साळवे, सुनंदा स्वामी, आश्लेषा भगत आदी कर्मचाऱ्यांची तीन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, कार्यालयीन अधीक्षक मो. अफजलोद्दीन, मुकुंद कोकड यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय ते होळकर चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये १२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून १२०० रुपये दंड वसूल केला.
...तर कारवाई करणार
शहरात सुरू असलेली खासगी शिकवणी केंद्र, मंगल कार्यालयांना भेट देऊन पाहणी करत कोरोना विषाणू संबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पथकातील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नागरिकांसह शहरातील व्यापार पेठेत असलेल्या व्यावसायिक व्यापारीवर्ग, खासगी शिकवणी केंद्र चालक, मंगल कार्यालयांच्या मालकांना देण्यात आला आहे.