सेलू ( परभणी): शहरातील छत्रपती नगर भागात राहणाऱ्या एका नववीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) दुपारी १२.३० च्या सुमारास समोर आली. मृत मुलीचे नाव साक्षी सलाने असे आहे.
साक्षी ही आपल्या मोठ्या बहिणी मानसी सलाने (वय १६) हिच्यासह महिला शिक्षिका यमुना रामदास मेश्राम यांच्या देखरेखीखाली राहत होती. यमुना मेश्राम या मूळच्या पितांबरवाडी (ता. किनवट) येथील असून सध्या परतूर तालुक्यातील गणेशपूर येथील शाळेत कार्यरत आहेत. त्या सध्या सेलूतील छत्रपती नगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात.
साक्षी आणि मानसी या दोघींचे वडील ज्ञानेश्वर सलाने हे गेल्या काही काळापासून बेपत्ता आहेत. तर आई अर्चना सलाने यांच्यावर मानसिक आरोग्याचे गंभीर परिणाम असल्यामुळे दोघी बहिणी लहानपणापासून आपल्या आत्या यमुना मेश्राम यांच्यासोबत राहत होत्या.
शुक्रवारी यमुना मेश्राम या एका विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी मानसी घरातील एका खोलीत बसली होती. दरम्यान, साक्षी हिने कपडे आवरते, असे सांगून शेजारच्या खोलीत गेली व दरवाजा बंद केला. काही वेळाने मानसीने खोलीत डोकावले असता, साक्षीने दोन ओढण्यांच्या साहाय्याने स्लॅबच्या हुकाला गाठ मारून गळफास घेतल्याचे दृश्य दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच सपोनी प्रभाकर कवाळे आणि पोलीस हवालदार सुरेश पुलाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात साक्षीने पलंगावर उभे राहून बांबूच्या सहाय्याने ओढणी हुकात ओवली व त्याद्वारे गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही थोडीशी रागीट व मानसिक अस्वस्थतेचा स्वभाव असलेली होती, अशी माहिती तिच्या आत्या यमुना मेश्राम व बहिण मानसी यांनी दिली आहे.