लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे ६०० डोस जिल्ह्याला रविवारी उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना, रेमडेसिवीर इंजेक्शन संबंधित रूग्णाला द्यावे लागते. गेले दोन दिवस जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत होती. याच अनुषंगाने परभणी शहरातील नगरसेवक सचिन देशमुख यांनी शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून परभणी शहरासह जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब त्यांच्या कानावर घातली होती. त्यावेळी टोपे यांनी हे इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देशमुख यांना दिले होते. तसेच या अनुषंगाने ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात वृत्तही प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्याला ‘रेमडेसिवीर’ची ६०० इंजेक्शन्स उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे सध्यातरी या इंजेक्शनचा प्रश्न सुटला आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी ‘लातूर पॅटर्न’ची मागणी
रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हमखास काळाबाजार होते. त्यामुळे निश्चित किमतीपेक्षा अधिक दराने हे इंजेक्शन काही विक्रेत्यांकडून विकण्यात येते. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी कोणत्या विक्रेत्याकडे किती रुपयात इंजेक्शन उपलब्ध आहे, याची नियमित माहिती समाजमाध्यमांतून देण्यास सुरूवात केली आहे. संबंधितांचे संपर्क क्रमांकही प्रसिद्धी पत्रकात देण्यात आले आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या काळा बाजाराला आळा बसला आहे. हाच ‘लातूर पॅटर्न’ जिल्ह्यात राबविण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.