१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:29 PM2018-06-19T19:29:01+5:302018-06-19T19:29:01+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पाहणीतून दिसून आले़.

45 patients on 19 beds; Status of Parbhani District General Hospital | १९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती 

१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती 

Next

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ त्यामुळे रुग्णांसह डॉक्टरांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पहावयास मिळाले़ 

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघात विभाग, पुरुष वैद्यकीय कक्ष, जळीत रुग्ण कक्ष, स्त्री वैद्यकीय, बाल रुग्ण, पोषण पुनवर्सन केंद्र, शल्यकक्ष, पुरुष शल्य कक्ष व संसर्गजन्य कक्षाचा समावेश आहे़ या वेगवेगळ्या दहा विभागांतर्गत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांकडून सेवा दिली जाते़ या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या वतीने ४०६ खाटांची मंजुरी आहे़ मात्र परभणी जिल्ह्याची व्याप्ती ही मोठी आहे़

जिल्ह्यात ९ तालुक्यांचा समावेश असून, हिंगोली, जालना आदी शेजारील जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येथे येतात़ मात्र गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यात दाखल होण्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे़ २८ मे ते १७ जून या कालावधीत रुग्णालयातील दहा उपविभागांतर्गत ३७० रुग्णांवर उपचार करण्यात येत होते़ तसेच दररोज नवीन १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत़ त्यामुळे रुग्ण दाखल होण्याची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे; परंतु, शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ४०६ खाटांचीच मंजुरी दिली आहे़ त्यामुळे खाटांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होत असल्याने डॉक्टरांना नाईलाजास्तव एका खाटावर दोन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत़

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये सोमवारी पाहणी केली असता, या कक्षात रुग्णालय प्रशासनाच्या वतीने १९ खाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ मात्र या कक्षामध्ये सोमवारी तब्बल ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पहावयास मिळाले़ एका खाटावर दोन-तीन रुग्णांवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते़ खाटांअभावी रुग्णांना उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे या रुग्णालयासाठी नवीन २०० खाटांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांतून होत आहे़ 

सलाईन पुरवठा होईना
जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेतात़ या रुग्णांसाठी सलाई अत्यावश्यक असते़ मात्र गेल्या काही दिवसांपासून या कक्षातील रुग्णांना सलाईनचा पुरवठा रुग्णालय प्रशासनाकडून होत नाही़ सलाईनचा पुरवठा तत्काळ करण्यात यावा, यासाठी १६ व १८ जून रोजी कक्षाच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला सलाईनचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी पत्रही पाठविण्यात आले आहे़ मात्र सोमवारपर्यंत या कक्षामध्ये सलाईनचा पुरवठा करण्यात आला नाही़ त्यामुळे रुग्णांच्या रोषाला परिचारिकांना सामोरे जावे लागत आहे़ याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ सलाईनचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़ 

वातावरणात बदल झाल्याने रुग्ण वाढले
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे़ त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, जुलाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ बहुतांश रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० विभागांतर्गत ४०६ खाटांची संख्या आहे़ मागील काही दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ झाल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे़ 

लवकरच नवीन खाटा भेटतील 
शासनाकडे नवीन १५० खाटांचा प्रस्ताव पाठविला आहे़ तो मंजूरही झाला आहे़ खाट तयार आहेत़ आठ दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन १५० खाटांचा समावेश होणार आहे़ त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे़ 
- डॉ़ जावेद अथर, जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी

Web Title: 45 patients on 19 beds; Status of Parbhani District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.