परभणी : मागच्या तीन वर्षांपासून क्षयरुग्णांची शोध मोहीम सुरू असून, या काळात ५ हजार २१ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी ४ हजार २८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
येथील जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्षयरोगाचे लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांवर उपचार करून त्यांना क्षयरोगमुक्त केले जाते. मागच्या तीन वर्षांत ४ हजार २८ रुग्णांनी क्षय रोगावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. योग्य निदान व योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होतात. हे मृत्यू टाळण्यासाठी क्षयरोगाची लक्षणे आढळताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
क्षयरोग हा फुप्फुसाव्यतिरिक्त लसिका ग्रंथी, आतडे, हाड, सांधे, मेंदू आवरण, गर्भाशयाच्या नलिका, डोळ्याच्या आतील भाग, कातडी यांना होऊ शकतो. जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये ५ हजार २१ रुग्णांना क्षयरोगाची लक्षणे आढळली. या रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने ४ हजार २८ रुग्ण क्षयरोगमुक्त झाले आहेत.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असणारा खोकला, ताप, भूक मंदावणे, रात्री येणारा घाम व ताप, वजनामध्ये घट होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेला कातडीखाली न दुखणाऱ्या लसिका ग्रंथी आदी क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केेले आहे.
२०१९ मध्ये नोंद झाले सर्वाधिक रुग्ण
मागील तीन वर्षांच्या काळात क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. २०१९ मध्ये १,९६८ रुग्ण नोंद झाले होते. त्यापैकी १,७८७ रुग्णांनी क्षयरोगावर मात केली. त्याचप्रमाणे २०१८ मध्ये १ हजार ६५३ रुग्णांची नोंद करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात १ हजार ४९४ रुग्ण क्षयरोगमुक्त झाले आहेत. तर २०२० मध्ये १,४०० रुग्ण नोंद झाले असून, त्यातील ९४७ रुग्ण बरे झाले आहेत.