'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

By राजन मगरुळकर | Published: March 10, 2024 05:38 PM2024-03-10T17:38:41+5:302024-03-10T17:39:17+5:30

सहा महिन्यांपूर्वी १० सदस्य, आता स्वच्छतादुतांची संख्या ३००पार

300 Swachha Dutas took up the mission of Swachh Parbhani; A continuous campaign is being conducted every Sunday | 'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

राजन मंगरुळकर, परभणी: आपले शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त, रोगराईमुक्त व सुसज्ज असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध भागांत सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यास सुरुवात झाली. सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला १० सदस्य असलेल्या मोहिमेत आता प्रचार, प्रसार आणि कार्यामुळे सदस्य संख्या ३०० दुतापर्यंत पोहोचली आहे. दर रविवारी किमान दोन तास नवीन वसाहतीमध्ये श्रमदान स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ परभणीचा ध्यास सहभागी दूतांनी घेतला आहे.

जगात जर्मनी आणि भारतात आपली परभणी असे नेहमीच बोलले जाते. याच परभणीचे आगळे वेगळेपण अनेक बाबींमध्ये आहे. हे वेगळेपण ठळकपणे जाणवते. शहराची वाढलेली व्याप्ती, वसाहतींचा विस्तार, लोकसंख्या आणि वाढलेल्या समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता सामान्य नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी संकल्प करण्यात आला. शहरातील विविध भागातील घाणीचे साम्राज्य, पसरणारे आजार, रोगराई, अस्वच्छता कमी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गांधी जयंतीदिनी दोन ऑक्टोबर २०२३ ला हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून ग्रुपची स्थापना झाली. प्रत्येक आठवड्यात रविवारी नियोजित ठिकाणी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत मोहीम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला यामध्ये दहा स्वच्छता दूतांनी सहभाग नोंदविला. मोहिमेची सुरुवात झाली, त्या नंतर शहरात दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढली. सोबतच हे काम पाहून हळूहळू सदस्य संख्या वाढली आणि विविध भागांमध्ये नवीन सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी सहभाग नोंदविला.

विविध प्रभागातील नागरिक, डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, बँक कर्मचारी, अभियंते, व्यापारी, व्यावसायिक, तरुण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वच्छता दूत म्हणून सहभागी होण्याचा निश्चय केला. या सर्वांनी केवळ आपल्या प्रभागातच स्वच्छता न करता नवीन प्रभाग शोधून त्या-त्या ठिकाणी दर रविवारी जाऊन दोन तास श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे नवे स्वच्छता दूत जोडल्या गेले आणि ही मोहीम गेल्या ३२ आठवड्यांपासून दर रविवारी सुरु आहे. यामध्ये डॉ.संदीप कार्ले, डॉ.विजय साई शेळके, डॉ.शेखर देशमुख, डॉ. दिनेश भुतडा, डॉ.गजानन जोशी, डॉ.केदार कटिंग यांनीही सहभाग नोंदविला.

या भागात स्वच्छतेचे प्रयत्न

मोहिमेंतर्गत आजपर्यंत प्रभावती नगर, गांधी पार्क, व्यंकटेश नगर, नवीन जिल्हा परिषद इमारत, बस स्थानक, डॉक्टर लेन, पूर्व प्रभावती नगर, त्रिमूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, ममता कॉलनी पाण्याची टाकी, गजानन नगर, जैन मंदिर याशिवाय अन्य भागातही सक्रियपणे राबविण्यात आली. मंदिर, मोकळी जागा, शिवाय वसाहतीतील अन्य समस्या ज्या स्वच्छता दूतांना सोडविता येतील, अशा सर्व बाबी मांडल्या. माझा परिसर स्वच्छ ठेवणे माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वजण पुढे सरसावले आहेत. त्यातून आपली परभणी, स्वच्छ परभणी करण्याचा निरंतर संकल्प सुरु आहे.

या बाबींची जनजागृती

कचरा जाळायचा नाही, तो घंटागाडीत टाकायचा, झाडे तोडायचे नाहीत, खूप मोठा भाग स्वच्छ करण्यापेक्षा छोटा भाग निवडून त्या ठिकाणी पूर्ण काम करायचे, वेगवेगळ्या कॉलनीत डर्टी पॉइंट नष्ट करण्यासाठी, स्वच्छतेबद्दल जनजागृती करावी, ⁠प्रत्येक ठिकाणी रिकामे प्लॉट्स हे कचराकुंडी झालेत. त्यामुळे ते साफ करणे याची जनजागृती केली जात आहे.

Web Title: 300 Swachha Dutas took up the mission of Swachh Parbhani; A continuous campaign is being conducted every Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.