परभणी : शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी तोडफोड आणि नुकसानीचा प्रकार घडला. यामध्ये जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यात २७ जणांचा समावेश असून या सर्वांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या २७ आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरात बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या तोडफोड आणि नुकसानाच्या प्रकरणात पोलिस पयंत्रणेकडून सायंकाळनंतर आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओसह विविध माहिती आणि तपासाच्या माध्यमातून अनेकांना ताब्यात घेतले होते. यात नवा मोंढा पोलीस ठाण्यात सायंकाळी यात आरोपींना आणल्यावर त्यांची चौकशी केली जात होती. पोलिस यंत्रणेकडून यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करून २७ जणांना ताब्यात घेत त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले होते. या २७ आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
विविध कलमान्वये ५०० हून अधिक जणांवर गुन्हेसार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील नवा मोंढा, नानलपेठ, जिंतूर, गंगाखेड अशा सर्व पोलिस ठाण्यात मिळून एकूण ५०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात लाखो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे नमूद केले आहे. यामध्ये सर्व पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती आणि ओळखीच्या अशा दोघांचाही फिर्यादीत समावेश आहे.