परभणी : राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि.परळीच्या परभणी येथील शाखेत खातेदार व गुंतवणूकदारांना वार्षिक अकरा ते तेरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावली. यानंतर काही महिन्यांनी व्याजाचे पैसे जमा होणे बंद झाल्याने खातेदारांनी जमा केलेल्या रकमेची मागणी केली. परंतू, त्यांचे रक्कम अद्याप परत देण्यात आले नाही. त्यामुळे राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळासह चेअरमन शाखाधिकारी अशा १४ जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये एकूण २१ गुंतवणूकदारांची ७६ लाख ३५ हजार ४८९ रुपयांची गुंतवणूक करून विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत सेवानिवृत्त कर्मचारी अनिल आरबाड यांनी मंगळवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. हा प्रकार १० मार्च २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला होता. फिर्यादी यांच्यासह एकूण २१ जणांनी परभणी शहरातील कच्छी बाजार भागात असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.परळी (वै) च्या परभणी शाखेत वेगवेगळी रक्कम गुंतवली होती. फिर्यादी यांच्यासह इतरांना आमच्या सोसायटीत पैसे जमा करा, आमच्याकडे ठेवीवर इतर बँकांपेक्षा जास्त व्याजदर आहे, तुम्ही मोठी रक्कम सोसायटी ठेवली तर तुम्हाला दरमहा चांगल्या प्रमाणात व्याज मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यावरून अनेकांनी विश्वास बसल्याने संबंधित शाखेत खात्यामध्ये किंवा विविध प्रकारच्या एफडी, गुंतवणुकीच्या आकर्षक व्याजदर योजनेमध्ये पैसे गुंतवले होते.
याबाबत सर्व २१ गुंतवणूकदारांनी मिळून ७३ लाख ८४ हजार ८५२ रुपये मुद्दल गुंतवली होती. या सर्व रकमेवरील व्याजासह ७६ लाख ३५ हजार ४८९ रुपये एवढी रक्कम गुंतवणूक करून सर्व खातेदारांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला. वेळोवेळी संबंधित खातेदारांनी बँकेकडे चौकशी केली. व्याज जमा होत नसल्याने संपर्क केला. मात्र, शाखाधिकारी यांच्यासह इतरांनी तुमची रक्कम आज परत देतो, उद्या देतो असे खोटे आश्वासन दिले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी नानलपेठ ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ४०६, ४०९, ४२०, १२० ब आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये कलम तीन-चार नुसार गुन्हा नोंद झाला.
यांच्याविरुद्ध नोंदविला गुन्हाअध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीष सारडा, अजय पुजारी, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, परभणीचे शाखा व्यवस्थापक गोपी सोमानी या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद केला.
आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार वर्गविविध प्रकारच्या बँका तसेच पतसंस्था आणि इतर ठिकाणच्या ठेवीमध्ये २५ लाखांच्यावर फसवणूक झाल्याच्या प्रकरणात हा तपास किंवा गुन्ह्याची व्याप्ती पाहता तो आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला जातो. त्यानुसार आता या प्रकरणातही पोलीस ठाणे आर्थिक गुन्हा शाखेकडे गुन्हा वर्ग करतील, असा अंदाज आहे. यापूर्वी जिल्ह्यात अशा विविध प्रकारच्या अधिकच्या व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.