जिंतूर तालुक्यातील सोनापूर येथील संजय धर्मा चव्हाण (३५ वर्षे) यांना ८ एकर जमीन आहे. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. या कर्जास तसेच शेतीतील नापिकीस कंटाळून १९ जुलै रोजी सकाळी ४ ते ७ च्या दरम्यान संजय चव्हाण यांनी शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मयत संजय चव्हाण यांचे चुलते नारायण जेमा चव्हाण यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांडा येथे घडली. येथील रुख्मिणबाई चव्हाण यांना २ एकर जमीन आहे. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे ८७ हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील दीड वर्षापासून शेतीतील उत्पन्न निघाले नाही, म्हणून रुख्मिणबाई चव्हाण यांचा मुलगा परमेश्वर चव्हाण (२१ वर्षे) हा सतत चिंतेत असायचा. याच विवंचनेतून तसेच शेतातील नापिकीस कंटाळून परमेश्वर चव्हाण याने १८ जुलै रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घरातील पत्र्याखालील आडूला विद्युत वायरने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत बळीराम चव्हाण यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून १९ जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST