परभणी : येथील महानगरपालिकेच्या १२३ कोटी १० लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास ३० मार्च रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.महापौर अनिताताई रविंद्र सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मनपाची ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, मुख्य लेखाधिकारी डॉ.काळदाते, अंतर्गत लेखाधिकारी राठोड, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहायक लेखापाल भगवान यादव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मागील वर्षीची जमा आणि खर्चाचा ताळेबंद सभेसमोर मांडण्यात आला. यावेळी सभागृह नेते माजू लाला, गुलमीर खान, बाळासाहेब बुलबुले, सुनील देशमुख, नागेश सोनपसारे, इम्रान हुसैनी, सचिन देशमुख, सचिन अंबिलवादे यांनी अर्थसंकल्पावर सूचना केल्या. स्मशानभूमीमध्ये मानधनावर काम करणारे कर्मचारी, मजुरांचे पगार दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये करावेत, अशी मागणी सुनील देशमुख यांनी केली. नगरसेवक मेहराज कुरेशी यांनी ग्रंथालयात नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी ३ लाखांची, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी १० लाखांची तर पुस्तक बांधणीसाठी २५ हजारांऐवजी १लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली. उपमहापौर भगवान वाघमारे यांनी नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे तरतुदीत वाढ करण्याचे सूचविले. नगरसेवक महेबूब खान, विकास लंगोटे, प्रशास ठाकूर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली. महिला व बालकल्याण, समाज कल्याणसाठी निधीची तरतूद करुन तो खात्यात जमा करावा, अशी सूचना नागेश सोनपसारे, विकास लंगोटे यांनी केली. उपायुक्त प्रदीप जगताप, देविदास जाधव, मुख्य लेखाधिकारी डॉ.काळदाते, राठोड, भगवान यादव, मंजूर अहमद, नगरसचिव विकास रत्नपारखे आदींच्या सहकार्याने हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला.
१२३ कोटींच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST