राज्य शासनाने विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वस्तीगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील परभणी, पाथरी, सेलू, जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे वस्तीगृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वस्तीगृहाच्या बांधकामाकरिता राज्य शासनाने जिल्ह्याला ९३ लाख ६१ हजार ४४८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्यामध्ये परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १३ लाख ७२ हजार १२० रुपये, गंगाखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १४ लाख २५ हजार ७७० रुपये, पाथरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १६ लाख ६७ हजार ९९० रुपये, सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १६ लाख ७९ हजार ४७० रुपये, जिंतूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १४ लाख ७७ हजार ६८९ रुपये आणि पूर्णा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला १६ लाख ७८ हजार ७९० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदरील निधी वितरणास राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने २५ मार्च रोजी मान्यता दिली आहे. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सदरील वस्तीगृहाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.