शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

झूम डिसमॉर्फिया- हा आजार तुम्हालाही झालाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 7:56 AM

झूम मीटिंग करताना आपलाच चेहरा पाहत बसणारे अनेक, फेस टाइम करतानाही तेच, त्यामुळं आपल्याच चेहऱ्यातील दोष दिसू लागले, आपण ‘असे-कसे’ भयाण दिसतो, असं म्हणत स्वत:च्याच चेहऱ्यावर रुसणारे अनेक आहेत. हा काय नवा आजार?

-माधुरी पेठकर

सोशल मीडिया हे संवादाचं, अभिव्यक्तीचं एक माध्यम होतं; पण आता हे माध्यम म्हणजे जगण्याचाच एक भाग झालं आहे. कोरोनामुळं लॉकडाऊनच्या काळात जगानं चलनवलन व्यवहारात अनेक निर्बंध अनुभवले. माणसं एकमेकांना भेटू शकत नव्हती; पण सोशल मीडियामुळं मात्र माणसं एकमेकांच्या संपर्कात होती. एकमेकांना भेटू-पाहू- ऐकू- बोलू शकत होती. कोरोना काळात जगण्यात जिवंतपणा आणण्याचं काम या सोशल मीडियानं केलं. अभिव्यक्तीचे सर्व व्यवहार सुरळीत करणारा हाच सोशल मीडिया आज अनेक प्रश्नांचं कारणंही बनला आहे. तरुण मुलांच्या जगण्यात हे प्रश्न गंभीर होत आहेत. असंही म्हणता येईल की, अर्थात हे खूप आधीपासून घडतच होतं; पण कोरोनाकाळात या विकृतींनी गंभीर वळण घेतलं असल्याचं या काळातले अनेक अभ्यास सांगत आहेत.

बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर

सोशल मीडियावरचे आपले फोटो हा जगभरातील तरुण- तरुणींचा जिव्हाळ्याचा विषय. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवरील फिल्टर्समुळे फोटोतील दोष काढून आपल्याला हवा तसा फोटो एडिट करता येत असल्यामुळं फोटो काढण्याचा आणि तो शेअर करण्याचा, त्यावर लाइक्स, कमेन्टस्‌ मिळविण्याचा नाद अनेकांना आहे; पण या नादामुळं आपल्याच फोटोच्या प्रेमात असलेले अनेक तरुण प्रत्यक्षातील स्वत:चा मात्र राग करत आहेत. आपण जसे आहोत त्यात त्यांना असंख्य दोष दिसत आहेत. आपल्यातील या दोषांमुळं स्वत:बद्दलची असंतुष्टता तरुणांमध्ये निर्माण होत असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे. स्वत:च्या दिसण्याबद्दलची ही असंतुष्टता मानसिक विकृतींना कारण ठरत आहे. ‘बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर’ ही अशीच एक मानसिक विकृती. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं आणि सोशल मीडियातील आपल्या फसव्या प्रतिमेच्या प्रेमात पडून स्वत:बद्दलची असंतुष्टता निर्माण करणारी ही विकृती. या विकृतीचे बळी जगभर आढळत आहेत.

गिलिअन क्लेन ही २३ वर्षांची तरुणी अमेरिकेतील लोवा राज्यातील डेस मॉनिस या शहरातील. बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डरमुळं तिला भूक मंदाविण्याचा आजार जडला. काही वर्षांपूर्वी तिला या आजारामुळं रुग्णालयात दाखल केलं गेलं. आता ती बरी होण्याच्या टप्प्यात आहे. एकेकाळी सतत सोशल मीडियावर पडीक असलेल्या गिलिअननं बरं होण्यासाठी या सोशल मीडियाचं तोंडही न पाहण्याचं ठरवलं आहे. सतत सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहत बसण्याचं, या फोटोंची तुलना स्वत:शी करण्याचं वेड तिला जडलं होतं. त्यातच तिचा मित्रासोबत ब्रेकअप झाला. सोशल मीडियावरील फोटोंची तुलना, त्यामुळं स्वत:बद्दल निर्माण झालेली नारजी आणि मित्रासोबतचा ब्रेकअप, यामुळं स्वत:च्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेलं नकारात्मक मत यामुळं तिला भूक मंदाविण्याचा आजार जडला. तिला दवाखान्यात जेव्हा दाखल केलं गेलं तेव्हा तिचे हृदयाचे ठोकेही मंद झाले होते. गिलिअन ही अशा प्रकारे बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डरची बळी ठरली होती. आज तिला जाणीव होते आहे की, आपण पूर्वी जे फोटो सोशल मीडियावर पाहत होतो, ज्यांच्याशी स्वत:ची तुलना करत होतो त्या व्यक्ती प्रत्यक्षात आपल्या समोर आज वावरत आहेत आणि त्यांचे चेहेरे, दिसणं हे फोटोसारखं बदललेलं नाही. ते खरं आहे; पण सोशल मीडियातील त्यांच्या देखणेपणाचा त्रास आपण स्वत:ला करून घेतला. हे खरं नसतं, हे आपण तेव्हाच स्वत:ला सांगितलं असतं तर? असा प्रश्न गिलिअनला पडतो आहे.

अभ्यासकांच्या मते सोशल मीडियातील फोटोंबाबत ‘हे खरं नसतं’ हे प्रत्येकानं स्वत:ला सांगण्याची गरज आहे; पण हे होत नाहीये. होतं मात्र उलटंच आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात तर आता ‘बॉडी डिसमॉर्फिया’चं प्रमाण जगभर वाढत असल्याचं चित्रं आहे.

झूम डिसमॉर्फिया

कोरोनाकाळात सर्व ऑनलाइन चालू होतं आणि ते तसंच मोठ्या प्रमाणावर पुढंही सुरू राहणार आहे. ऑनलाइन काम, अभ्यास, मीटिंगच्या काळात ‘झूम’ या शब्दाची तर खूपच चलती झाली. या झूममुळं अनेक गोष्टी एका बाजूला सुरळीतपणे मार्गी लागत होत्या, तर दुसऱ्या बाजूला स्वत:ला पाहणं, जोखणं, स्वत:ची तुलना सतत इतरांशी करत राहणं या गोष्टीही समांतर पातळीवर घडत होत्या. झूम मीटिंगा, झूमवर अभ्यास करता करता स्वत:च्या चेहेऱ्यावरील डाग, मुरूम, सुरकुत्या हे जास्तच ठळकपणे दिसू लागले. गुगल सर्च ट्रेण्डस्‌बद्दल नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाने कोरोना काळात ॲक्ने आणि हेअर लॉस या दोन गोष्टी ऑनलाइन सर्वांत जास्त शोधल्या गेल्या, असं म्हटलं आहे. या अभ्यासानं या ॲक्ने आणि हेअर लॉसचा संबंध भीती आणि नैराश्याशी जोडला आहे. लॉकडाऊन काळात अनेकांमधे भीतीची आणि नैराश्याची परिस्थिती निर्माण झाली. ऑनलाइन अभ्यास, मीटिंग यानिमित्तानं सतत स्वत:ला बघत असल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं अभ्यासक म्हणतात.

झूम हा सोशल मीडियात कोरोनाकाळात प्रचलित झालेला ट्रेण्ड; पण त्याआधी स्नॅपचॅट, इन्स्टावर फिल्टरच्या आधारे एडिट केलेले फोटो टाकण्याचा एक ट्रेण्ड होता. यामुळे लोक आपल्या फिल्टर इमेजच्याच प्रेमात पडले. फोटोत जसे आपण दिसतो, तसे प्रत्यक्षात नाही, ही न्यूनतेची भावना निर्माण होऊन, तसे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आणि त्यामुळंच या ‘बॉडी डिसमॉर्फिक’ विकृतीचा प्रसार वेगानं झाला. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ फेसिअल प्लास्टिक ॲण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी’ या टीमच्या ७२ टक्के सभासदांना सेल्फीसाठी स्वत:चा चेहेरा सुधारावा म्हणून रुग्णांचा कॉस्मेटिक सर्जरीकडे ओढा वाढत चालल्याचं आढळलं आहे. सोशल मीडियाशी घनिष्ठ नात्याचा परिणाम म्हणून स्वत:च्या शरीराबद्दलची असंतुष्टता वाढत चालल्याचं चित्रं आहे. झूम हे ॲप आपल्याला आपल्या प्रतिमेची एडिटेड किंवा सुधारित स्थिर प्रतिमा दाखवत नाही, तर जशी आहे तशी गतिमान प्रतिमा दाखवतो आणि त्यामुळंच अनेकांना स्वत:बद्दलच्या कमतरता मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत आणि त्याही रोज आणि त्यातूनच स्वत:च्या शरीराबद्दलचं असमाधान वाढत असून, सौंदर्य सर्जरी करण्याची इच्छा अनेकांना होऊ लागली आहे.

रोजचं प्रत्यक्ष आयुष्यातील संभाषण आणि वेबकॅमद्वारे झूमवरील संभाषण यात मोठं अंतर असतं. रोज आपण जेव्हा दुसऱ्याशी बोलत असतो तेव्हा बोलताना आपल्याला समोरच्याचा चेहेरा दिसत असतो. आपल्याला समोरच्याच्या चेहेऱ्यावरचे हावभाव, भावभावना दिसत असतात. या संभाषणाप्रसंगी आपण आपल्या दिसण्याची तुलना समोरच्याशी करत नसतो; पण झूमसारख्या ॲपद्वारे व्हिडिओ संभाषण करताना आपल्याला आपला चेहेरा दिसत असतो आणि आपण आपल्या दिसण्याची तुलना सतत इतरांशी करत राहातो; पण हे करताना आपल्या हे लक्षात येत नाही की, कॅमेरा दाखवत असलेली इमेज ही तंतोतंत बरोबर नसते. एक अभ्यास सांगतो की, १२ इंचांवरून काढलेल्या फोटोत नाकाचा आकार पाच फूट अंतरावरून काढलेल्या फोटोपेक्षा जास्त मोठा असतो. चेहेरा खूपच मोठा, गोलाकार दिसतो. जवळून काढलेला फोटो बघताना डोळे, नाक, चेहेरा हा पसरट दिसतो. हा अभ्यास म्हणतो की, प्रत्येकानं वेबकॅमच्या मर्यादांचं भान ठेवायला हवं आणि आपण जसे आहोत (आपल्या दोषांसह) तसे आपण छान आहोत, हे समजून घ्यायला हवं; पण हे होत नाही. वेबकॅमद्वारे दिसणारा आपला चेहेरा बघून आपल्यातील कमतरता लोकांना जाणवत आहेत. चेहेऱ्यावरचे डाग, मुरूम, सुरकुत्या बघून त्यांना औदासीन्य येत आहे. याबाबतची झूमची थिअरी समजून घेणं गरजेची आहे. ही थिअरी गमतीशीर आहे आणि महत्त्वपूर्णही. यात रुग्ण हाच प्रेक्षक असतो. जो आपला चेहेरा बघत असतो. इतरांना आपला चेहेरा बघून वाईट वाटण्याआधी या रुग्णांनाच स्वत:चा चेहेरा बघून वाईट वाटतं, उदास वाटतं. रुग्ण जितका वेळ झूमसारख्या ॲपवर असतात तितका वेळ ते वास्तव आणि कल्पित कमतरतेशी झगडत असतात आणि स्वत:बद्दलची ही चिकित्सा लोकांमध्ये समस्या निर्माण करत आहे. आतापर्यंत बॉडी डिसमॉर्फिया होता, आता तो झूम डिसमॉर्फिया झाला आहे.

 

सोशल मीडिया अट्टहास आणि बॉडी इमेज

सोशल मीडिया आणि बॉडी इमेज यांचा घनिष्ठ संबंध आहे. सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना आपण सतत फोकसमधे, चर्चेत असावं, अशी प्रत्येकाचीच महत्त्वाकांक्षा असते आणि ही महत्त्वाकांक्षाच स्वत:बद्दल कमीपणाची भावना आणि स्वत:च्या शरीराबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. बॉडी इमेजचा सरळ सरळ अर्थ आपण इतरांना आणि स्वत:ला कसे वाटतो, हा आहे आणि म्हणूनच स्वत:बद्दल अवास्तव, हास्यास्पद अपेक्षा बाळगल्यास बॉडी इमेजबद्दलची नकारात्मकता निर्माण होते आणि ही नकारात्मकता व्यक्तीची हानी करते, तसेच सोशल मीडियावर वावरताना सतत चांगलं दिसण्याचा, लाइक्स मिळविण्याचा, सकारात्मक कमेन्टस्‌ मिळविण्याचा दबाव असतो. ऑनलाइन असलेल्या लोकांकडून मान्यता मिळविण्याची इच्छा हेसुद्धा एक व्यसनच आहे. या सर्व बाबींचा परिणाम बॉडी इमेजवर होतो आणि त्यातूनच बॉडी डिसमॉर्फिकसारख्या विकृती बळावतात. यासाठीच सोशल मीडिया जागरूकपणे वापरण्याची गरज अभ्यासक व्यक्त करतात.

 

(माधुरी लोकमत वृृत्तसमूहात उपसंपादक आहेत.)

madhuripethkar29@gmail.com