प्रवासातल्या त्या 15 दिवसांनी काय शिकवलं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:30 IST2020-03-19T06:30:00+5:302020-03-19T06:30:02+5:30
छत्तीसगड, 15 दिवस, 12 जिल्हे -बलात्काराच्या घटनांनी नुस्तं बसल्याजागी अस्वस्थ होणं, सोशल मीडियात व्यक्त होणं यापेक्षा स्वतर् काहीतरी करायला हवं असं म्हणून बस्तरच्या आदिवासी भागात काम करणारी तरुण डॉक्टर स्वत: 12 आदिवासी जिल्ह्यांत फिरली, तरुण मुलामुलींशी बोलली तेव्हा तिच्या हाती जे लागलं त्याची ही गोष्ट.

प्रवासातल्या त्या 15 दिवसांनी काय शिकवलं?
-डॉ. ऐश्वर्या रेवडकर
15 दिवस आणि 12 जिल्हे असा प्रवास करत करत मी भिलाईत पोहोचले. अस्वस्थ झाले होते. त्याच काळात भिलाईमध्ये प्रचंड थंडी पडली होती. चंद्रेश, त्याची बायको प्रतिभा आणि त्यांची दोन महिन्यांची मुलगी नादिरा यांच्याकडे जरा आराम केला. त्याचदरम्यान मुंगेलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सर्वेश भुरे यांनी बिलासपूरला माझी मैत्रीण डॉ. मृणालिनी हिचं एक सेशन आयोजित केलं होतं. तोवर 9 जानेवारी उजाडली होती. मी प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. शारीरिक आणि मानसिकरीत्याही खूप थकून मी रायपूरला पोहोचले. 10 तारखेला रायपूरच्या मुलींच्या महाविद्यालयातील वसतिगृहात अडीच तास सेशन घेऊन मग माझ्या कॅम्पेनचा समारोप केला.
त्या दिवशी मी संध्याकाळी रायपूर येथील माझ्या आवडत्या ‘नुक्कड’ कॅफेमध्ये आले. नुक्कड कॅफे ही ज्याची संकल्पना तो प्रियांक पटेल, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काम करतो, माझा मित्र. फेसबुकवर मी माझ्या प्रवासाविषयी जे लिहित होते, ते त्यानं वाचलं होतंच. नुक्कडमध्ये भेट झाल्यावर त्याने अधिक खोलात माहिती विचारली. अनुभव ऐकले. त्याच्या अनुभवानुसार मला हे प्रयत्न आणखी यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केलं.
तसंही माझ्या फेसबुकच्या पेजवर ‘सफर - स्री सम्मान की खोज में’ या शिर्षकानुसार मी रोज रात्री दिवसभराच्या उपक्रमांची नोंद प्रसिद्ध करायचे, सोबत फोटो जोडायचे. या उपक्रमाची आणि मुळात त्याची आवश्यकता का आहे ही माहिती लोकांना कळावी हा त्यामागचा हेतू होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रबोधन असल्याने मी काही मित्र-मैत्रिणींचा छोटा ग्रुप बनवून त्यांना विविध विषयांवर लेख लिहायला सांगितले. रोज सकाळी एक लेख फेसबुकवर प्रसिद्ध केला. असे एकूण 14 लेख, एक कविता प्रसिद्ध झाली. हे सर्व एकत्र करून त्याचं ऑनलाइन पुस्तक प्रसिद्ध करायचंही आता आम्ही ठरवतो आहोत. माझे मित्र-मैत्रिणी नीरजा कुद्रीमोती, समीक्षा गोडसे, डॉ. सानिया खान, डॉ. गौरी गायकवाड, अॅड. बॉबी कुन्हू, करन सिंग, डॉ. नीलेश मोहिते, मनीष खैरे आणि माझी आई प्रोफेसर डॉ. भारती रेवडकर अशा विविध लोकांनी लेख लिहिले. माझ्या एका सेशनमध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी वैशाली गुप्ता हिनेसुधा उत्स्फूर्तपणे एक लेख लिहिला.
हा सारा प्रवास मानसिक-शारीरिकदृष्टय़ा परीक्षा पाहणाराच होता. आता मी जेव्हा ताळेबंद मांडतेय तेव्हा मला वाटतं की या ‘सफर’ने मला काय दिलं?
तर त्याचीच ही एक लहानशी नोंद. सफरनामाच.
1) 12 जिल्ह्यांत एकूण 15 दिवसात 28 सेशन्स झाले.
2) माझ्या आय टेन या कारने मी एकूण 1325 किलोमीटर प्रवास केला. पेट्रोल आणि चहा-नास्त्याचा खर्च मी केला, बाकी जेवणाची सोय माझ्या स्थानिक मित्र-मैत्रिणींनीच केली.
3) गुड टच, बॅड टच, लहान मुलांचे लैंगिक शोषण, पोस्को कायदा, किशोरावस्था बदल, मासिकपाळी आणि विटाळ भ्रम, शरीरशास्र, सेक्स म्हणजे काय, लैंगिक अधिकाराचे वय, युवावस्था, कन्सेंट म्हणजे काय, बलात्कार, छेडखानी, प्रेम, आकर्षण, लग्न, गर्भनिरोधकं, पुरु षसत्ताक व्यवस्था, स्रीवाद, लिंग समानता, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी लढलेली लढाई अशा अनेक विषयांवर आम्ही बोललो.
4. मुलं आणि मुली दोन्ही समोर वेगवेगळं आणि एकत्र बोलायचा मला आत्मविश्वास आला. शिक्षकांनी मला कुठेही थांबवलं अथवा अडवलं नाही. उलट बिलासपूरच्या खासगी शाळेत पहिले फक्त मुलींसाठी सेशन घेण्याची परवानगी मिळाली; परंतु सेशन ऐकून त्यांनी नंतर मुलांसाठीसुद्धा सेशन घेण्याची विनंती केली. तिथे मुलांच्या सेशनला स्वतर् प्रिन्सिपल हजर राहिले. त्यात मुलांना मी लैंगिक शिव्यांचा अर्थ समजून सांगत होते. कौतुक करताना प्रिन्सिपल म्हणाले, ‘लडकी के मुॅँह से ये बाते सुनके लडको की हवा टाइट हो जाती है.’ अनेकवेळा सुरु वातीला मला पाहून आणि मी स्वतंत्रपणे ही कॅम्पेन करते आहे हे ऐकून, काही लोकांना थोडा अविश्वास वाटायचा. सल्ले दिले जायचे; परंतु एकदा सेशन सुरू झालं की शिक्षकसुद्धा इतके समरसून जायचे आणि 20 मिनिटांचं सेशन दोन-अडीच तास रंगायचं. मुलांना प्रश्न विचारले तर शिक्षकच उत्साहाने प्रतिसाद द्यायचे. मी शाळेतून निघताना सर्वजण प्रेमाने मला खाऊपिऊ घालायचे, पुन्हा यायचं निमंत्रण द्यायचे. कुठलंही चांगलं काम करायला निघालं की सर्वजण आपणहून मदत करतात आणि निरपेक्ष प्रेम देतात, याचा मला अनुभव आला.
5) मुख्य म्हणजे या प्रवासात माझ्या बुद्धीला नव्यानं काही खाद्य मिळालं. विविध नावीन्यपूर्ण सेशन्स तयार करता आली. माहिती गोष्टी रूपात सांगण्याची, समोरच्याला बांधून ठेवता येईल असं रंगतदार वर्णन करण्याची कला शिकता आली.
6) विविध सामाजिक संस्थांसोबत काम करण्याची, त्यांची विचारसरणी आणि काम करण्याची पद्धत समजून घेण्याची संधी मिळाली.
7) दररोज मी नव्या जागी जात होते. स्वतर्चं सुरक्षित कवच तोडून नव्या लोकांशी बोलत होते. माझ्या मनाच्या कक्षा, सुरक्षेच्या व्याख्या त्यातून बदलत गेल्या. अधिक समृद्ध झाल्या, विस्तारल्या.
8) फेसबुकवरच नाही तर प्रत्यक्ष जीवनातही समान विचारसरणीचे खूप चांगले मित्र-मैत्रिणी मिळाल्यात.
9) संपर्कात येणार्या विविध वयोगटातील, विविध क्षेत्रातील लोकांचे वर्तन आणि मागची धारणा जवळून पाहता आली. असे नवीन अनुभव मिळाले.
10) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सर्वच स्रियांना पुरु षसत्ताक पद्धतीत नानाप्रकारे शोषणाचा अनुभव येतो. त्यांना व्यक्त व्हायचं असतं, बोलायचं असतं, मात्र तशी संधी मिळत नाही. कुणी ऐकून घेणारं नसतं. पण एकदा भरवसा वाटला तर मुली मोकळेपणानं बोलतात. मुलगेही आपले अनुभव सांगतात. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
11) सेशनच्या सुरु वातीला लाजणार्या मुली शेवटी आत्मविश्वासाने समोर येऊन फळ्यावर सेक्स, लैंगिक शोषण, बलात्कार, योनी, कन्सेंट हे शब्द लिहायच्या तेव्हा आपण आरोग्य शिक्षणाच्या योग्य वाटेवर आहोत हे पटायचं.
12) अनेकदा लोकांना वाटायचं की ही स्रीरोगतज्ज्ञ आहे तर केवळ मासिकपाळीबद्दल बोलावं, स्वच्छता शिकवावी आणि पोषक आहार सांगावा; परंतु माझं काम तेवढंच मर्यादित नाही, याची मला जाणीव होती. ती अधिक समृद्ध झाली.
13) रायपूरमध्ये एक नुक्कड कॅफे आहे. इथं ‘विशेष वेगळे’ लोक काम करतात. (मूकबधिर, ट्रान्सजेंडर) सामाजिक भान असणार्या प्रियांकने हा विशेष लोकांसाठी सन्मानपूर्वक रोजगार निर्माण केला आहे. तीन मजली इमारत खूप सुंदर चित्रे, साहित्यिक, क्रांतिकारक यांची स्फूर्तिदायक वाक्यं, संवेदनशील गाण्यांच्या ओळी अशा अनेक ढंगाने नटली आहे. स्वतंत्र लायब्ररी आहे, जिथे समविचारी लोक जमतात. रंगभूमी नावाची एक खोली आहे, तिथंच एका अर्थानं या प्रवासाचा मी समारोप केला.
14) मात्र हा प्रवास आणि ही गोष्ट इथंच थांबली नाही, पुढे काय झालं त्या विषयी पुढच्या अंकात.
( लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)