हो जा रंगीला रे
By Admin | Updated: March 24, 2016 21:15 IST2016-03-24T21:15:55+5:302016-03-24T21:15:55+5:30
आपला ‘मूळ’ रंग विसरून, रंगून जावं सगळ्या धसमुसळ्या उत्साही रंगात असं वाटण्याचे हे दिवस.

हो जा रंगीला रे
आपला ‘मूळ’ रंग विसरून,
रंगून जावं
सगळ्या धसमुसळ्या उत्साही रंगात
असं वाटण्याचे हे दिवस..
काल होळी-धुळवड साजरी झाली..
परवा सोमवारी तर रंगपंचमीच !
मात्र मनमुक्त रंगांची उधळण करत,
चिंब भिजत त्या रंगात रंगून जावं,
असे सध्या दिवस नाहीत !
यंदा खऱ्या अर्थानं शिमग्याची बोंब आहे,
आणि राज्यभर पाण्याच्या थेंबभर दर्शनासाठी
आयाबाया पायांचे तुकडे पडेस्तोवर
डोईवर हंडे घेऊन फिरताहेत..
मग असे ‘तहानलेले’ दिवस असताना
पाण्याच्या पिचकाऱ्या माराव्यात
इतकं बेजबाबदार आपलं तारुण्य नक्कीच नाही !
त्यामुळे दरवर्षीप्रमाणं पाण्याची नासाडी न करता,
डीजे लावून आॅइलपेण्ट नी सिल्व्हर-गोल्डन कलर्स
एकमेकांना न चोपडता,
जरा वेगळ्या रंगात रंगून पाहिलं तर?
हे रंग आहेत उत्साहाचे, आनंदाचे,
मनातलं सारं कडवट काळपट जहर
पुसून टाकत स्वच्छ सफेद रंगानं
नव्या सप्तरंगी वाटचालीचं स्वप्न पाहणारे..
निसर्गातले...
पळसाचे, पांगिऱ्याचे, गुलमोहराचे,
पानांआडून हळूच डोकावणाऱ्या
आंब्याच्या सुगंधी मोहराचे नी
वसंत आला म्हणून निष्पर्ण फांद्यांवरही
नव्यानं फुटणाऱ्या पानांच्या हिरवटपणाचे !
या साऱ्या रंगपंचमीकडेही यंदा जरा पाहू..
आणि त्या रंगात रंगू..
पाणी आणि कृत्रिम, भयाण दिसणारे रंग न वापरताही
रंग खेळता येतील, त्या रंगात रंगता येईल, रंगवता येईल..
त्यासाठीची नजर,
आणि त्यातून दिसणारे रंग यांची एक खास रंगपंचमी
पान ४-५ वर.
आपल्या अवतीभोवती इतके रंग आहेत,
इतक्या छटा आहेत,
निसर्गाची इतकी उत्फुल्ल उधळण आहे
आणि त्यात मनमुराद आनंद आणि चैतन्यही आहे.
त्या आनंदी उमेदीचा, चैतन्याचा,
प्रसन्नतेचा थोडा रंग थोडा आपल्यालाही
रंगवून जावा याच शुभेच्छा !!
हो जा रंगीला..
- आॅक्सिजन टीम