मातीतली कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 02:09 PM2018-01-10T14:09:16+5:302018-01-11T08:46:10+5:30

लाल मातीतल्या पहिलवानांची जिंदादिल गोष्ट शोधत तरुण मुलं आखाड्यात जातात आणि..

Wrestling in soil | मातीतली कुस्ती

मातीतली कुस्ती

Next

- प्रांतिक देशमुख

(‘मातीतली कुस्ती’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शॉर्टफिल्मचा लेखक, दिग्दर्शक आणि संकलक आहे.)

शब्दांकन- माधुरी पेठकर

यवतमाळहून पुण्याला आलो. बारावीनंतर. सिनेमाचं आकर्षण होतंच. मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, थेट पुणे; फर्ग्युसन कॉलेज. फिल्म बनवण्याचा प्रोजेक्ट करायचा होता. आमचा दहा- बारा जणांचा क्रू, विषय शोधत होतो. त्यात चिंचेची तालीम हा आखाडा भेटला. २३६ वर्षे हा जुना आखाडा.

रिसर्चचा भाग म्हणून मी चिंचेच्या तालमीत गेलो. वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली आठ- नऊ वर्षांच्या मुलापासून कसलेले पहिलवान तालीम करत होते, मातीत रग जिरवत होते. माझ्या डोक्यात कुस्ती घोळायला लागली. वस्तादांशी, तालमीतल्या पहिलवानांशी बोलल्यानंतर खरं चित्र स्पष्ट झालं. हजारो वर्षांची परंपरा लाभलेली कुस्ती. एकेकाळी तिला राजाश्रय- लोकाश्रय होता. या काळात कुस्ती फळली, फुलली. पण आता मातीतल्या कुस्तीची जागा मॅटवरच्या कुस्तीनं घेतली. तालमीतल्या पहिलवानांना जेव्हा मॅटवरची कुस्ती खेळण्याचा आग्रह होतो तेव्हा खूप यातना होतात. माती नाही तर आपली आई हिरावली जातेय या भावनेनं कसलेल्या पहिलवांनाचा जीव व्याकूळ होतो.
आखाड्याच्या चार भिंतीआड पहिलवानांच्या मनाला कुरतडणारी ही व्यथा माझ्या मनाला भिडली. ‘पहिलवानासाठी माती म्हणजे आई’ हे वाक्य माझा पिच्छा पुरवत होतं. मीही याच परंपरेत वाढलो. यवतमाळसारख्या छोट्या शहरात जन्मलो, लहानाचा मोठा झालो म्हणून कदाचित मला हा विषय जास्त भिडला. मुंबई-पुण्यात, शहरात वाढलो असतो तर कदाचित हा विषय असा भिडला नसता. गावात शेतकरी डबघाईला आलेली शेती पाहू शकत नाहीत तसाच पहिलवानही मातीतल्या कुस्तीची अवहेलना सोसू शकत नाही हे जाणवत होतं. मग मी हाच विषय फिल्मसाठी निवडला.

दोन- अडीच महिने रिसर्चसाठी गेले. आखाडा आता सवयीचा झालेला होता, पहिलवान ओळखीचे झाले, पण आमचा कॅमेरा मात्र त्यांच्या ओळखीचा नव्हता. त्याला पाहून कुस्तीतले दादा पहिलवान घाबरले. पहिलवान कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नाही हे पाहून आम्ही कॅमेरा बंद करून ठेवला. आठ दहा दिवस हेच. रूटीन होतं. हळहळू त्यांना आमच्या कॅमेऱ्याची भीती वाटेनाशी झाली. मग नकळत आम्ही कॅमेरा सुरू केला. शूटिंगसाठी पोझ दिलीय असा एकही क्षण न आणता पूर्ण शूटिंग अगदी नैसर्गिकपणे कॅमेराबद्ध केलं. या फिल्मचं ८० टक्के शूटिंग २० बाय १५ च्या छोट्या जागेत झालंय. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट, मोण्टाज फिल्म हा फिल्मचा फॉर्म्युला मी ठरवला. पण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटची कल्पना काही माझ्या क्रूला पसंत पडली नाही. पण मी ठाम होतो.

फिल्म पूर्ण झाल्यावर तिचं स्क्रीनिंग करू लागलो. पण अनेकांना ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट प्रकरण काही रुचत नव्हतं. तीन- चार महिने मी अजिबात स्क्रीनिंग केलं नाही, की कुठं कौतुकानं फिल्मही पाठवली नाही. आणि पुढे याच फिल्मला ३ मे २०१७ रोजी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. पुढे राष्ट्रीपतींच्या हस्ते बक्षीसही मिळालं.

पुरस्कार मिळाला, माझं कौतुक झालं; पण शूटिंगदरम्यान आखाड्यात जी वेदना मी अनुभवली ती मी कधीच विसरू शकणार नाही. मातीतली कुस्ती नामशेष होत चालल्याचं पहिलवानांच्या, वस्तादांच्या शब्दांतून, त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषारेषांतून जाणवतं. ती वेदना मला आजही अस्वस्थ करते.
 

 

Web Title: Wrestling in soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.