वतन के वास्ते

By Admin | Updated: August 14, 2014 15:36 IST2014-08-14T15:36:30+5:302014-08-14T15:36:30+5:30

देशासाठी मरण्याच्या बाता न मारता देशासाठी ‘जगण्या’ची धडपड करणार्‍या तरुण मित्रमैत्रिणींच्या जगात..

For the wort | वतन के वास्ते

वतन के वास्ते

>१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विशेष
 
एक जपानी  किस्सा आहे.
खराखोटा? कुणास ठाऊक.
टोक्योमध्ये म्हणे, एक माणूस रस्त्यावर काहीतरी घाण टाकतो, कागदाचे कपटे, कसले तरी रॅपर टाकतो. बसस्टॉपवर खडूने काहीतरी खरडतो.
हे सारं तो करत असताना एक तरुण त्याच्या मागोमाग चालत असतो.
त्यानं टाकली घाण की ह्यानं उचलली, त्यानं फेकले कागद की ह्यानं उचललंच.
त्यानं खरडलं काहीतरी बसस्टॉपवर ह्यानं खिशातला रुमाल काढून पुसलं चटकन.
एक भारतीय माणूस हे सारं पाहत होता, न राहवून शेवटी त्यानं त्या तरुणाला विचारलं की, तो माणूस तुझा कुणी लागतो का, तू का कामधाम सोडून हे सारं करतो आहेस?
तो म्हणाला, ‘तो माणूस माझा कुणी नाही, पण हा देश, हे शहर तर माझंय ना, माझ्या देशाच्या इमेजचा प्रश्न आहे. माझ्या देशातले रस्ते स्वच्छ ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. याहून तातडीचं आत्ता दुसरं काय काम असू शकेल?’
 
हा किस्सा खरा असो वा नसो, 
विचार करा, आपण करतो का आपल्या देशाचा इतका बारकाईनं विचार?
 देशभक्तीचं आपलं ‘फिलिंग’ हे असं आणि इतकं प्रॅक्टिकल असतं का?
आज १५ ऑगस्टच्या निमित्तानं जरा पाहिलंच स्वत:ला आरशात आणि विचारलं की, माझी देशप्रेमाची-देशभक्तीची व्याख्या काय आहे? 
-तर काय असेल आपलं उत्तर?
स्वातंत्र्यलढय़ात आणि युद्धात प्रयत्नांची शर्थ करत भारतमातेच्या चरणांवर आपल्या प्राणांची फुलं वाहणार्‍या आणि देशावर-देशबांधवांवर आलेल्या प्रत्येक आपत्तीचा सामना करत सर्वोच्च बलिदान देणार्‍या सैन्यदलातल्या जाबांजाइतकं शौर्य खरं सांगा, कुठंय आपल्यात?
क्रिकेटच्या फायनल मॅचपुरतं, मल्टिप्लेक्समधल्या अंधारात रक्त तापवण्यापुरतं आणि २६ जानेवारी, १५ ऑगस्ट अशा मुहूर्तांवर उचंबळून येण्यापुरतं देशप्रेम असतं आपलं!
आणि आता तर आपल्या याच भावुक मनाला सोशल नेटवर्किंगचं नवं शस्त्र मिळालंय. बसल्या जागी काही न करता आपण बरंच काही ‘करतो.’ फॉरवर्ड करतो, लाईक ठोकतो, कमेण्टा मारतो आणि आपण किती अँक्टिव्ह पेट्रिऑटिक म्हणजेच सक्रिय देशभक्त आहोत याचे नुस्ते आभास निर्माण करतो. 
लेकीन सच तो यही है,
देश के लिए ना तो हम मरते है, 
ना ही ‘जिते’ है.
देशासाठी प्राणांचं बलिदान द्यायची संधी मिळो ना मिळो, देशासाठी ‘जगायची’ संधी तरी आपल्याला नक्की मिळू शकते.
आपण ती मिळवू शकतो.
आणि देशासाठी जगायचं म्हणजे काहीतरी भव्यदिव्यच करायला हवं, सगळं सोडून एकदम समाजसेवकच व्हायला हवं हे कुणी सांगितलं?
सरकार, सिस्टिम, समाज काही करो ना करो आपण देशासाठी ‘जगू’ शकतो.
आणि शोधलं, तर हे ‘असं’ जगणारे मित्रही भेटतात, सापडतात आपल्याला.
हा देश, ही माणसं आपली आहेत म्हणत 
छोटे का होईना उपक्रम करणार्‍या 
काही तरुण दोस्तांची भेट या अंकात.
त्यांचे प्रयत्न छोटे असतील, 
पण त्यामागची भावना सच्ची आहे.
अशा सच्च्या ‘स्वतंत्र’ भावनेनं या देशात मूळ धरावं या भावनेसह स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा.
आपलं स्वातंत्र्य चिरायू आहे.
चिरायू राहो.!
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com

Web Title: For the wort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.