ऊर्जेचं कराल काय?

By Admin | Updated: August 29, 2014 09:42 IST2014-08-29T09:42:17+5:302014-08-29T09:42:17+5:30

उत्सव बुद्धीच्या देवतेचा, तो निर्बुद्धपणे का साजरा करायचा?

Will you do energy? | ऊर्जेचं कराल काय?

ऊर्जेचं कराल काय?

>गणेशमंडळात गावोगावी एवढे तरुण जमतात. ‘काहीतरी’ करण्यासाठी धडपडतात,
उत्साहानं कष्ट करतात, जीवाचं रान करुन गणेशोत्सव ‘यशस्वी’ करण्यासाठी रात्रंदिवस राबतात,
पण या ‘सेलिब्रेशन’चं यश नक्की कशात आहे? काय केलं म्हणजे आपल्या उत्साहाला अधिक विधायक,अधिक सकस रूप देता येईल? कशातून साकारेल अधिक आनंददायी आणि सकारात्मक गणेशोत्सव? याच प्रश्नांच्या उत्तरासह तरुण ऊर्जेला विधायक कृतीचा दृष्टिकोन देणारा एक खास संवाद..
 
गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. मग त्याच्या उत्सवात बुद्धीला चालना देणार्‍या गोष्टी करायला हव्यात. सध्यातर बुद्धीची अवनतीच करणार्‍या गोष्टी सर्रास केल्या जाताना दिसतात. धांगडधिंगा, व्यसनं हे सारं गणेशोत्सवात होताना दिसतं. गणेशोत्सव ज्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाला, त्याचा हेतू काय होता?
सामाजिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी, समाजासाठी काहीतरी विधायक काम करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात झाली. आता त्याच गणेशोत्सवात जे राजकारण, अर्थकारण, धर्मकारण शिरलंय ते टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात अपेक्षित नव्हतंच.
ढोल ताशांचे आवाज, त्यातून होणारं प्रचंड ध्वनीप्रदूषण, व्यसनं, व्यसनांच्या जाहिराती हे सारं गणेशोत्सवात टाळता येणार नाही का?
समाजोपयोगी, जाणीवजागृतीपर उपक्रम या उत्सवात सहभागी होणारी तरुण मुलं सुरू करु शकणार नाहीत का?
इतकी मोठी तरुण ऊर्जा जर एकत्र येते, तर त्यातून संघटित-उत्तम असं काहीतरी समाजासाठी नक्की घडवता येऊ शकतं.
अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, सामाजिक प्रश्न याविषयी उत्तम जनजागृती तरुण मुलं गावोगावी करु शकतात. त्यासाठीचे देखावे तयार केले जाऊ शकतात, पथनाट्य केली जाऊ शकतात आणि मुख्य म्हणजे आपल्या उत्सवामुळे आणि उत्सवी उत्साहामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी तर नक्की घेता येईल.
सध्या गणेशोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल होते. गणेशमंडळांकडेही मोठी आर्थिक क्षमता असते. तिचा वापर राजकारणासाठी करण्यापेक्षा किंवा करु देण्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या वंचित असलेल्या घटकांपर्यंत तो पैसा पोहचवता येऊ शकतो.
नुकतीच माळीणसारखी दुर्घटना झाली, अशा दुर्घटनांमुळे ज्यांच्यावर संकट ओढावलंय अशा माणसांना नव्यानं आयुष्य उभं करण्यासाठी या पैशाचा उपयोग करता येऊ शकतो.
समाजात चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून गणेश मंडळातील तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा जर अशा कामांच्या, उपक्रमांच्या पाठीशी उभी राहिली तर कितीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतील.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह असतो, काहीतरी करण्याची मोठी ऊर्जा आणि उमेदही असते. त्या ऊर्जेला आणि उमेदीला आणि संघटित होऊन काम करण्याला विधायक रुप कसं द्यायचं याचा विचार प्रत्येक गणेश मंडळाने, तरुण कार्यकर्त्याने करायला हवा.
तो केला आणि त्यातून छोट्या छोट्या का होईना चांगल्या गोष्टी घडल्या तर गणेशोत्सवाला खर्‍या अर्थानं अभिप्रेत असलेल्या गोष्टी घडतील.
नाहीतर तरुणांच्या ऊर्जेचे नुस्ते उत्सवीकरण होऊन ती ऊर्जा राजकारण आणि धर्मकारणात विरुन जाईल.
असे होऊ नये.
सण जर बुद्धीच्या देवतेचा आहे तर तो निबरुद्धपणे का साजरा करायचा?
जरा डोक्याला चालना मिळेल, हातून काही बरं काम घडेल, असं काहीतरी या उत्सवात तरुण कार्यकर्त्यांनी नक्की शोधायला हवं.
शोधलं तर सापडू शकेल, असं मला वाटतं!
- डॉ. हमीद दाभोलकर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस
 
 
एवढं तरी कराच !
 
१) पर्यावरणपूरक गणपती ही कल्पना प्रत्येक मंडळानं जरुर राबवावी. अंनिसतर्फे अनेक शहरांत निर्माल्य दानाची मोहीम राबवली जाते. निदान आपल्या मंडळात, घरात दहा दिवस जमा होणारं निर्माल्य नदीत न टाकता दान करावं. त्यातून खत तयार करुन शेतीला देण्याचा उपक्रम अंनिस अनेक वर्षे राबवतेय. त्या उपक्रमात सहभागी होता येऊ शकतं.
२) उच्च न्यायालयानं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरायला बंदी केली आहे. मंडळांनीही मोठ-मोठय़ा मूर्ती आणण्याची स्पर्धा न करता छोट्या मूर्ती, त्याही शाडू मातीच्या किंवा मातीच्या आणाव्यात. मोठय़ा मूर्ती  विसर्जित न करता दान करता येऊ शकतात.
३) विसर्जनासाठी जे कृत्रिम तलाव तयार केले जातात त्या तलावात विसर्जन करता येईल, तिथं विसर्जन करण्यासाठी अन्य मंडळांना, व्यक्तींना प्रोत्साहन देता येईल.
 
(शब्दांकन -ऑक्सिजन टीम)

Web Title: Will you do energy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.