विग

By Admin | Updated: March 24, 2016 21:10 IST2016-03-24T21:10:48+5:302016-03-24T21:10:48+5:30

केस गळायला लागले. एकदम ‘टकलू’ झाले. मग लक्षात यायला लागलं की, पंख्याचा वारा डायरेक्ट डोक्यावरच यायचा,

Wig | विग

विग

 - शची मराठे
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)
केस गळायला लागले.
एकदम ‘टकलू’ झाले.
मग लक्षात यायला लागलं की,
पंख्याचा वारा डायरेक्ट डोक्यावरच यायचा,
त्यामुळे डोक्यावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटायचं !
भिंतीवर डोकं टेकलं की,
डोक्याला एकदम गार लागायचं. 
उशीवर डोकं ठेवलं की तेच !
इतकी वर्षं डोक्यावर केस असल्यामुळे 
डोक्याला हवाच लागली नव्हती.
विचित्रच सगळं. 
केसांवर तसं सगळ्यांचंच प्रेम असतं. पण मुलींचं जरा जास्तच असतं. माझंही होतंच. खांद्यापर्यंत पोहोचणारे दाट-सरळ माझे केस. पोनीटेल बांधताना रबरबॅण्डचा दुसरा वेढा घेताना दम लागायचा इतके जाड. त्यात मला स्कार्फ बांधायची भयानक हौस होती. बंडाना स्टाइल, हेअरबॅण्डसारखे आणि बऱ्याच काहीबाही स्टाइल्सने मी स्कार्फ बांधत असे.
‘होती ना फार हौस, घ्या देवानं दिलीय संधी ! लावा आता विग आणि बांधा वरती स्कार्फ’ - मी मनाशीच म्हटलं. एक दिवस सकाळी उठले. नेहमीप्रमाणे धावत जाऊन आरशात पाहिलं. पहिल्या किमोनंतर १० दिवस मी रोज हेच करत होते. अजून केस गळायला लागले नव्हते, तरीही मी स्कार्फ बांधायला सुरुवात केली. सवय म्हणून. लोकांना आणि मलाही.
एकदा दुपारी केस विंचरताना अचानक कंगव्यात खूप सारे केस आले आणि पोटात धस्स झालं. अखेर ती वेळ आली तर. खूप खूप भीती वाटली. एक दोन दिवस गेले. केस गळतच होते. मग हळूहळू केसांखालची त्वचा दिसू लागली. अरे ! हे तर टक्कल. माझी ट्यूब पेटली. आता विग बनवायला हवा. आईच्या वेळीही तिच्यासाठी विग करून घेतला होता. बाबांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या विगवाल्याचा फोन नंबर घरच्या डायरीत लिहून ठेवला होता. त्यांचं डॉक्युमेंटेशन जबरदस्त होतं. सगळया नोंदी परफेक्ट. विगवाल्याला फोन केला, तो आला. डोक्याचं माप घ्यायला. मला बघताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्टपणे उमटलं.
‘तुम्हाला कॅन्सर झालाय?’ 
- त्यानं शेवटी विचारलंच...
अशा प्रश्नांची मला हळूहळू सवय होत होती. इतक्या कमी वयात, तुम्ही किती लहान आहात इत्यादि इत्यादि ! त्यानं डोक्याचं माप घेतलं आणि म्हणाला, केस गळायला लागलेत. ते कापून टाका सगळे. मला आधीच बोलावलं असतं तर तुमच्याच केसांचा विग केला असता. वा ! म्हणजे शाबूत असलेले केस कापून विग कोण बनवेल - मी मनात बोलले. 
‘स्वत:च्या केसांचा विग अधिक नॅचरल दिसला असता’ - तो त्याचं मार्केटिंग करत होता. माझं लक्षच नव्हतं. बाबा मन लावून ऐकत होते. ‘मी सेलिब्रिटींनाही विग पुरवतो. एक्सपोर्ट करतो. तुमच्यासाठी डिस्काउंट. कॅन्सर पेशंट म्हणून.’
मी लगेच भानावर आले. वा ! कॅन्सर झाल्याचा पहिला फायदा. तो माप घेऊन निघून गेला. केस गळतच होते. केस घरात पडून सगळीकडे झाले असते, शिवाय गळलेले केसं एकमेकांत अडकून गुंता झाला असता. शेवटी मी ते सगळे केस हातात धरले आणि कात्री घेऊन कापून काढले. मीनू, माझी मैत्रीण आली होती पुण्याहून. खूप रडायला येत होतं. हातात मऊ मऊ केसं होते. मागचे केस कापता येत नव्हते. कात्री लागण्याचीही भीती होती. माझी बहीण खूप घाबरली. टकलू ताई बघून. मग मी गॅलरीत झोपाळ्यावर बसून मीनूला म्हटलं, तूच काप मागचे केस. तिने कापले. ती आणि मी आम्ही जाम किडे करायचो भेटलो की. तिला त्यातही काहीतरी क्रिएटिव्हिटी सुचली. मग बहीणही आली आणि दोघींनी मिळून मस्त केसं कापले माझे. एकदम बारीक बारीक. मी लगेच आरशात जाऊन पाहिलं. आता एकदम वेगळंच वाटत होतं. 
म्हणजे पंख्याचा वारा डायरेक्ट डोक्यावर. त्यामुळे डोक्यावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटत होतं. भिंतीवर डोकं टेकलं की डोक्याला एकदम गार लागायचं. उशीवर डोकं ठेवलं की पण असंच. इतकी वर्षं डोक्यावर केस असल्यामुळे डोक्याला हवाच लागली नव्हती. विचित्रच सगळं. 
एक जुनी ओढणी फाडली. तिचे 4-5 स्कार्फ केले, घरी वापरण्यासाठी. काही नवे घेतले, बाहेर वापरण्यासाठी. मी सतत डोक्यावरून हात फिरवायचे. अजूनही थोडे केस होते. मग हळूहळू तेही गेले. पापण्यांचे केस, आयब्रोचे केस, हातापायावरचे, सगळे सगळे केस गेले. बेल वाजली की मी आधी आत पळायचे, कोणाला कळू नये म्हणून. गॅलरीत उभं राहायची भीती वाटायची, कोणाला दिसेल म्हणून. आरशात बघताना घाबरायला व्हायचं. टीव्ही बघताना राग यायचा खूप. बाकी मैत्रिणींचे केस बघून खूप वाईट वाटायचं. माझे केस पुन्हा येतील तेव्हा मी ते जमिनीपर्यंत वाढवणार. असे मनसुबे मी अनेकदा रचले होते. विग तयार होऊन आला. तो मी घातला. मागे दोरी होती. त्यानं तो बांधायचा म्हणजे तो गळून पडायचा नाही. विग घातला की खूप खाज यायची. तो टोचायचा. मग खाजवताना विग हलायचा. त्या विगचा भांग आपली जागा सोडायचा.
विगवरून स्कार्फ बांधला की सेफ वाटायचं. मग कोणाला काही कळायचं नाही. गर्दीतलाच एक चेहरा आपला, असा कॉन्फिडन्स वाटायचा. कोणीही रस्त्यातून चालताना वेगळ्या नजरेनं पाहायचं नाही. त्यामुळे मग हळूहळू भीती कमी झाली. एकदा का टाटामध्ये शिरलं की मी मायनॉरिटीमधून मेजॉरिटीमध्ये यायचे. तिथे सगळेच स्कार्फधारी. विग घालूनही तो विजोड न वाटावा याची सगळ्याच जणी खटपट करायच्या. कोणी डोक्यावरून पदर घ्यायच्या, तर कोणी ओढणी. काही काही जणी तर विग के ‘मांग मे सिंदूर’ पण भरायच्या. हळूहळू विग घालून बाहेर वावरण्याचा माझा कॉन्फिडन्स वाढला.
खऱ्या केसांपेक्षाही अधिक काळजी या विगची घ्यावी लागायची. तो नीट टांगून ठेवावा लागे. म्हणजे त्या केसांचा गुंता होणार नाही. रोज दोन वेळा विंचरायचा. रविवारी विगची डोक्यावरून अंघोळ असा कार्यक्र म असायचा. एकदा आम्ही त्या विगचा हेअर कटही केला. तेवढंच जरा वेगळं काहीतरी. हल्लीच एका ओळखीच्यांना विग हवा होता म्हणून त्या विगवाल्याच्या दुकानात गेले होते. त्याने मला अर्थातच ओळखलं नाही. 
बिल करताना मी विचारलं त्याला, ‘तुम्ही जुने विग घेता का ? किती डिस्काउंट मिळेल?’
 

Web Title: Wig

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.