आकाश कशाला? आपली उडाण त्यापुढची आहे..
By Admin | Updated: June 23, 2016 16:42 IST2016-06-23T16:42:39+5:302016-06-23T16:42:39+5:30
हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनोविन लिव्हिंगस्टोन या विद्यार्थ्यानं केलेलं हे भाषण. ते इतकं गाजतंय सध्या की, हार्वर्ड फेसबुकपेजवर त्याला दहा कोटी व्ह्यूज मिळाले. पाच मिण्टाची ही आपली कविताच त्यानं सादर केली, आणि हिलरी क्लिंटनसह अनेकांनी ती सोशल साईट्सवर शेअर केली..

आकाश कशाला? आपली उडाण त्यापुढची आहे..
हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनोविन लिव्हिंगस्टोन या विद्यार्थ्यानं केलेलं हे भाषण.
ते इतकं गाजतंय सध्या की, हार्वर्ड फेसबुकपेजवर त्याला दहा कोटी व्ह्यूज मिळाले. पाच मिण्टाची ही आपली कविताच त्यानं सादर केली, आणि हिलरी क्लिंटनसह अनेकांनी ती सोशल साईट्सवर शेअर केली.. एका कृष्णवर्णीय तरुणानं आपलं भूत-भविष्य-वर्तमान उकलत आपल्या वेदनांसह स्वप्नांची केलेली ही गुंफण जगभरातल्या अनेक तरुणांना आपलीच आपबिती वाटतेय.. त्या कवितेचा हा संपादित, मुक्त अनुवाद.
Education then, beyond all other devices of human origin, Is a great equalizer of the conditions of men." - Horace Mann, 1848. ए४िूं३्रङ्मल्ल ३ँील्ल,
एकेकाळचं हे वाक्य, शिक्षणाची महती सांगणारं..
पण त्या काळात मला कुठं लिहिता येत होतं?
कुठं वाचता येतं होतं?
तसं करायचा प्रयत्न केला असता
तरी मरणच उभं राहिलं असतं समोर
पिढ्यांपिढ्या आम्हाला माहिती होती
ही ज्ञानाची सर्वोच्च ताकद,
पण ज्ञानाच्या तिजोरीला टाळं ठोकणाऱ्यांना
आम्ही कधी, कुठं विचारलं की,
कुठंय या कुलुपाची चावी?
दुर्दैवानं या वाटेवर मी याहून भयंकर फाळण्या पाहिल्या,
विजयाचं मत्त रुप पाहिलं
शाळेच्या चौकोनी वर्गात
उभ्या वाटण्या दिसल्या
‘कोटा’ या नावाखाली किलकिली झाली काही दारं,
पण तिथं शिकण्याचे आनंद कुठले?
‘‘विविधता, सामीलकी’’
हे दोन शब्द फक्त सतत वाजत राहिले..
त्या दिवसात वाटायचं की,
जंगली गुलाबाच्या काटेरी झुडपावर
उमललेल्या फुलासारखा मी एकटाच,
अन्यायाच्या काट्यासारखा..
मी वाटोळा, बडबड्या, चळवळ्या,
इतरांसाठी अडथळाच होतो
माझ्यातली ऊर्जा सगळ्या सीमा
ओलांडत सैरावैरा धावतच होती
माझ्या चेतना-जाणिवांतून,
तुमच्या अभ्यासाच्या, आकलनाच्या
आणि दर्जाच्या पलीकडे होतं हे धावणं
प्रेम आणि यातनांची एक
स्पष्ट अभिव्यक्ती म्हणून उभा मी
माझ्या धमन्यांतच सळसळत होती क्रांती
मी एक स्वप्न, साकार व्हायला आसुसलेलं,
माझा भूतकाळ, तो मला गप्प बसू देत नव्हता..
माझा देह, माझं मन
स्थिर असेलच कसं..
शिक्षक म्हणून,
आमच्यावर ओरडण्यापेक्षा, चिडण्यापेक्षा
आणि आम्हाला बांधून घालण्यापेक्षा मोकळं सोडा,
गरिबी आणि सुविधांची आबाळ
अज्ञान आणि धोरणांची वानवा
या दोरखंडातून मुक्त करा आम्हाला..
मी सातवीत होतो, माझ्या शिक्षिका
मिस पार्कर एकदा मला म्हणाल्या,
‘डोनोवन, आपल्या अंगात उसळणारी
ऊर्जा आपण चांगल्या कामासाठीही वापरू शकतो!’
आणि त्यांनी मला व्यासपीठ दिलं, बोलू दिलं,
माझ्या आवाजाला शब्द दिले
त्यांनीच सांगितलं की, आपल्या कहाण्या
या आपल्यासाठीच पायऱ्या असतात
ताऱ्यांपर्यंत पोहचवणाऱ्या,
त्या पायऱ्यांवर चढ आणि ओेंजळीत धर तारे
अजून उंच जा, खूप उंच
काळजापासून साद घाल आणि
उजळवून टाक सारं जग तुझ्या असीम ओढीनं
शिकवा आम्हाला, पण शिकवायचं तर
तुमच्याठायी गॅलिलिओसारखा संयम हवा.
तुम्ही ठरवलं तर विखुरलेली सारी टिंब
जोडत जोडत एक जिनिअस घडवू शकता
मिट्ट अंधारात स्वत:साठीच ज्योत होऊन उजळणारा.
तेव्हा जागे व्हा..
आवाज होऊ दे बुलंद
प्रत्येक मुलाच्या फाटक्या आभाळाला
तुम्ही उमेदीचे अस्तर लावत नाही तोपर्यंत काम करा
माझ्या वर्गात कितीतरी दिवस मी फक्त एक काळा ठिपका होतो..
सारं शोषून घेणारा, माझ्यातलाच प्रकाश साठवून ठेवणारा..
पण गेले ते दिवस
मी ही ताऱ्यांचा भाग झालो..
तुम्हीही व्हा..
आपल्या मागून येणारे सारेही होतील..
आपण सारे मिळून,
उदात्ततेच्या ताऱ्यांची एक महान आकाशगंगा
उजळवू शकतो..
पुढच्या पिढ्यांसाठी..
आकाशापर्यंत पोहचणं ही मंझील नाही,
ती सुरुवात आहे,
आपली उडाण त्याच्यापुढची आहे..
-डोनोवन लिव्हिंगस्टोन
( हार्वर्ड विद्यापीठ)
अनुवाद- चिन्मय लेले