मोठा उद्योग गावात का नको?
By Admin | Updated: October 15, 2015 17:39 IST2015-10-15T17:39:42+5:302015-10-15T17:39:42+5:30
आर्थिक चणचणीमुळे शिक्षण अर्धवट सुटलं.पण त्यांनी ठरवलं होतं, नोकरी करायची नाही, उद्योगच करायचा. आणि त्या उद्योगानं,आणि त्यातल्या गि:हाईकांनीच त्यांना एक नवा धडा शिकवला.

मोठा उद्योग गावात का नको?
>2002 ची दिवाळी. साडी नेसलेली एक निम्नमध्यमवर्गीय महिला कपाट विक्रीच्या दुकानात शिरली. सोबतीला तिचा मुलगा. गवंडीकाम करणारा. त्यांना कपाट घ्यायचं होतं. त्यांच्या आर्थिक कुवतीचा अंदाज लावून एक कपाट दाखवलं. बाईंना कपाट काही पसंत पडेना. मी मात्र महागडी कपाटं दाखवण्याचं टाळत होतो. नेमक्या त्याच कपाटांकडे ती महिला वळाली. मी म्हणालो, हे तुम्हाला परवडणार नाही. त्या मात्र अडून बसल्या. घेईन तर यातलंच एक! नाइलाजानं होती त्यापेक्षा कमी किंमत सांगितली. किंमत ऐकून त्या कपाट घेणार नाहीत असा माझा कयास होता. मी चुकलो. त्यांनी कमरेच्या पिशवीतून चुरगळलेल्या नोटा काढल्या अन् माझ्या हातावर तीन हजार टेकवले. उरलेले पैसे घेण्यासाठी तिचा मुलगा सायकलीवर टांग मारून गेला. त्या दोन तास दुकानातच बसून होत्या. मुलगा आला. परवडलेलं नसताना मी कपाट त्यांना दिलं. गंमत तर पुढे होती. प्रवरेपाटाच्या कडेला असलेल्या घरात हे कपाट जाईना. तिच्या मुलानं भिंत आणि दरवाजा फोडून ते घरात घातलं. पुन्हा भिंत आणि दरवाजा बांधून काढला. संघर्षाच्या काळात घडलेल्या या घटनेने माझ्या पारंपरिक व्यावसायिक कल्पनेच्या ठिक:या उडवल्या. व्यवसायाबद्दल माझी गृहीतकं कच्ची असल्याची जाणीव झाली. ग्राहकाची ‘पेईंग कॅपॅसिटी’ पुन्हा अभ्यासण्याची वेळ माझ्यावर आली. खरं सांगू, त्या कपाटात किती गमावले त्यापेक्षा त्या बाईने दिलेला धडा महत्त्वाचा ठरला. ज्याचं मोल आजही लावता येत नाही..
- खिशात फुटकी कवडी नसताना फर्निचर विक्रीच्या जगात उडी घेत आज श्रीरामपूरसारख्या खेडेवजा शहरात मॉल, संशोधन आणि निर्मिती प्रकल्प उभारण्याची कमाल करणारा श्रीरामपूरचा तरुण उद्योजक अभिजित कुदळे आपल्या संघर्षाची पानं उलगडत होता. राजेंद्र बबनराव भोंगळे हे त्याचे संघर्षातील पहिल्या दिवसापासूनच साथीदार! त्यात अभिजित यांना अविनाश आणि अमोल या भावंडांची खंबीर साथही मिळाली.
अविनाश सांगतात, ‘वडील श्रीरामपूर पालिकेच्या फिल्टर हाऊसवर नोकरीला होते. परिस्थिती जेमतेम. सहा-सहा महिन्याला होणारा पगार जगण्याची परीक्षा घ्यायचा. याही परिस्थितीत शिकायचं, हे एखाद्या मौजेसारखंच होतं. वडिलांनी मात्र कष्टानं शिकवलं. ड्रॉईंग टीचरचा डिप्लोमा करत असताना संगमनेर बाजार समितीत रात्रपाळीत पडेल ती कामं केली. त्यातून बरंच शिकलो. पास झाल्यावर पुणो गाठलं. एकीकडे भारती विद्यापीठात शिकत असताना, धनकवडीच्या पेट्रोलपंपावर काम करायचो. पैसे मिळायचे, पण शिक्षणाचा खर्च आणि हाती येणारा पैसा याचा ताळमेळच लागेना. त्यामुळे स्वप्नांचं गणित बिघडल्यासारखंच झालं. पण असं हरायचं नाही ही खूणगाठ बांधूनच पुन्हा श्रीरामपूर गाठलं. शिक्षण अर्थातच मधेच सुटलं!
पण एक पक्क होतं, नोकरी करायची नाही! करणार तर उद्योगच! पण कोणता? हे ठरवण्यात आणि शिकण्यात चार वर्षे खर्ची पडली. त्या चार वर्षातील प्रत्येक क्षण मात्र मला काही ना काही शिकवून गेला. खिशात एक रुपया नसताना माङयासारखाच संघर्ष करणारे, मात्र डोळ्यात प्रचंड विश्वास असणारे राजेंद्र यांच्या साथीने फर्निचरचं दुकान 2क्क्क् साली थाटलं! ग्राहक जमविण्याचा, नवनवीन फर्निचर कसे आणता येईल यावर डोकं लढविण्याचा उद्योग सुरूच होता. मग आधी सांगितलेल्या प्रसंगातील महिला भेटली आणि दिशाच बदलली. ग्राहकांना उच्च दर्जाचं फर्निचर हवं आहे. त्यासाठी ते प्रसंगी किंमतही मोजतील, हाच तो धडा होता. ‘डोण्ट अंडरइस्टिमेट दि पॉवर ऑफ कॉमन मॅन’ हे सूत्र गवसलं आणि कायापालटच झाला. व्यवसायातील उद्योगाने खरेच उद्योगार्पयत आणून सोडले. वाढत्या व्यवसायामुळे विदेश दौरेही सुरू झाले होते. त्यातून नव्या कल्पना जन्म घेत होत्या. विदेशातील उंची फर्निचर मॉल बघून, हे आपल्या गावात का नको, असा नवा प्रश्न मनात जन्माला आला. या प्रश्नाचे उत्तर साडेचार एकरातील फर्निचर मॉल, संशोधन-डिझाइन आणि निर्मिती उद्योगार्पयत घेऊन गेले. मोठय़ा शहरातून आणलेल्या फर्निचरचे अनेकांना अप्रूप असते. पण आम्ही मेट्रो शहरातील ग्राहकांना एका लहान शहरातून फर्निचर घेऊन जाण्याची सवय लावली. अत्याधुनिक मशीन्सवर डिझाइन झालेले ‘मेड इन इंडिया’ फर्निचर पाहून अनेकजण हरखतात, तेव्हा मनस्वी आनंद होतो.’
अविनाश आपला प्रवास मांडत सांगतात. उद्योग करू इच्छिणा:या तरुणांना ते एकच सांगतात, ‘आता मानसिकता बदला. नोकरीच्या मागे धावणं थांबवा. कल्पनेचं जग प्रचंड मोठं आहे. ते सत्यात उतरवण्याची धमकही आपल्यातच आहे. अनुकरणाचे दिवस आता संपले आहेत. आता स्वत:चं काहीतरी घडवा!’
मिलिंदकुमार साळवे