Why do youth behave like this? | घरोघरचे बबडे असे का वागतात?

घरोघरचे बबडे असे का वागतात?

-डॉ. श्रुती पानसे

चोविशीचा एक मुलगा. आई-बाबा मध्यमवर्गीय कुटुंबातले. शिक्षण घेऊन, वेगवेगळ्या नोकऱ्या करत, वरच्या पदांवर पोहोचलेले. मुलगा लहान होता तेव्हा आईने मुलाला वेळ दिलेला होता. बारावीला त्याला उत्तम मार्क मिळाले होते. त्याला ट्रेकिंगची विशेष आवड होती. मुलगा मोठा झाला. त्यानंतर थोडी गडबड सुरू झाली. रात्रीची भटकंती, दिवसभर घराबाहेर , कॉलेजला दांडी हे चालू झालं. पण मुलांचं वय बघता हे सगळं पालकांना नॉर्मल वाटलं. या वयात अशा पद्धतीने वेळ घालवला तरी प्रत्येकाला आपली जबाबदारी कळते. त्यामुळे बावीस- तेवीसपर्यंत बहुतांशी मुलं रुळावर आलेली असतात असं समजून घेणारे पालक.

पण झालं भलतंच, बाविशी -पंचविशीच्या आसपास आपोआप येणारा एक शहाणपणा, जबाबदारीची जाणीव मुलामध्ये विकसित होत नाहीये. उलट बारावीपर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि योग्य विकसित झालेली व्यक्तिमत्त्व नंतरच्या काळात एकदमच वेगळ्या दिशेने जाताहेत. हे त्या एकट्याचं उदाहरण नाही, अशी बरीच उदाहरणं अवतीभोवती दिसतात.

हे एक दुसरं उदाहरण. हा मुलगा सतत घराबाहेर राहत होता. दिवसा आणि रात्री श्रीमंत मित्राबरोबर त्याचा वेळ जायचा. त्याला अचानक घर आवडेनासं झालं, घरची माणसं, घरचं खाणं यापैकी काहीच आवडेनासं झालं. पण त्याच्या वडिलांचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं आणि इतक्या अपेक्षा होत्या की, या मुलाला जसं आवडेल तसंच खाणं घरी तयार व्हावं, याची त्यांनी खबरदारी घेतली. तो जेव्हा केव्हा घरी येईल, त्यावेळेला – मध्यरात्रीसुद्धा – त्याला हवं ते खायला मिळायला पाहिजे, अशी व्यवस्था त्यांनी केली. मध्यमवर्गातून उच्चवर्गात हे कुटुंब गेलं होतं. त्यामुळे ‘परवडणं’ हा मुद्दा नव्हताच. मात्र बाबांच्या लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वत:ला फार वाईट दिवस बघावे लागले होते. पण अशा अतिलाडामुळे मुलगा व्यसनाधीनसुद्धा झाला. त्याला एका परदेशी रिहॅबिलिटी सेंटरमध्ये पाठवावं लागलं.

ही मुलग्यांची उदाहरणं असली तरी मुलींच्या संदर्भातही पालक असे अनुभव सांगतात.

 

असं का घडलं ? याची काय कारणं असू शकतात?

 

१. पालकांची आर्थिक परिस्थिती सुधारणं ही चांगली गोष्ट आहे. पण ते झालं तरीही जी कुटुंबं राहणीमानात अचानक बदल करत नाहीत, ‘डाऊन टू अर्थ’ राहतात. स्वत:मध्ये जास्त बदल करत नाहीत त्या कुटुंबात ही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

२. मुलं मोठी होताना मित्र कसे आहेत, यावर खूपच गोष्टी अवलंबून असतात. कसेही मित्र असले तरी आपण ‘कुठे थांबायचं’ हे ज्या मुलांना समजतं त्यांच्या बाबतीत समस्या येत नाहीत.

३. काही घरांमध्ये मुलांवर खूपच बंधनं असतात, (अर्थात ही बंधनं ही सापेक्ष असतात), बारावीच्या वयानंतर ही बंधनं हळूहळू कमी होतात किंवा मुलं आपणहून ती दूर करतात, त्यामुळे मुलांना स्वत:वर नियंत्रण ठेवायचंच नसतं.

४. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे समाजात असणारी प्रलोभनं. वास्तविक ती असतातच; पण आता त्याची सहज उपलब्धता असणं ही गोष्ट खूपच गंभीर आहे.

५. व्यक्तिस्वातंत्र्य ही गोष्ट फार महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे ‘माझ्या आयुष्यात ढवळाढवळ नकोय’ हे वाक्य कोणीही कोणालाही म्हणू शकतं.

६. एका मर्यादेनंतर पालकांच्या हातात काहीही नसतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ‘पालकानी अमुक एका वयात अमुक गोष्टी करायला हव्या होत्या’ हे विधान करण्यात तसा काहीच अर्थ नाही.

 

हे सुधारायचं कसं?

१. लहानपणापासून मुलं अनुकरणातून शिकत असतात. आपल्या घरात आईबाबा कसे वागतात, कशाला महत्त्व देतात, कशाला महत्त्व देत नाहीत, जगात कोणत्या चांगल्या गोष्टी चालल्या आहेत, आणि कोणत्या गोष्टी टाकाऊ आहेत, हे सहज बोललं जायला हवं. बोलत राहायला हवं.

२. मुलांना उपदेश केलेला फार आवडत नाही. जी गोष्ट सहज जाता जाता बोलता येते, त्यासाठी उपदेशाची भाषा नको.

३. .आईबाबांना आपल्याबद्दल जी काळजी वाटते, ती मुलांपर्यंत पोहोचत असते. अनेकदा मुलं स्वत:ची योग्य काळजी घेतही असतात. पण अतिकाळजी केली आणि ती वारंवार बोलून दाखवली की मुलं चिडतात.

४. यापेक्षा काळजी करण्यामागचं खरं आणि तेवढंच कारण त्यांच्यापर्यंत पोहचवावं.

५. निर्माण झालेले प्रश्न प्रॅक्टिकल पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा.

६. निर्माण झालेल्या प्रश्नांवरचा सल्ला त्यांनाच मागावा. त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर चर्चा करावी.

७.हे प्रयत्न लहानपणापासून केले तर फारच चांगलं ठरेल.

८.मुलं आता मोठी असतील, आणि असा प्रश्न भेडसावत असेल तर त्यांच्याशी लहान मुलांप्रमाणे वागणं त्वरित थांबवावं. आणि थेट चर्चा करावी. ही चर्चा फक्त प्रश्नांवर असावी. उत्तरांची अपेक्षा त्यावेळी केली नाही तरी चालेल.

९. ही चर्चा जास्त लांबवायची गरज नाही. नाहीतर प्रश्न भरकटेल. काहीच उत्तर मिळणार नाही. प्रश्न तसाच राहील.

१०. आपलं प्रेम मुलांवर असतंच. खूपच असतं. पण ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा मार्ग कधीकधी चुकतो. मुलं चुकत असतील आणि ते खरंच चुकताहेत, याची खात्री असेल तर संवाद जास्त चांगल्या पद्धतीने करायला हवा. त्यामुळे प्रश्न सुटतील.

 

( लेखिका मेंदूअभ्यासक आणि समुपदेशक आहेत.)

drshrutipanse@gmail.com

Web Title: Why do youth behave like this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.