मी का वापरतो, सोशल मीडिया?

By Admin | Updated: September 11, 2014 17:13 IST2014-09-11T17:13:50+5:302014-09-11T17:13:50+5:30

सोशल मीडिया आपल्या आजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Why do I use social media? | मी का वापरतो, सोशल मीडिया?

मी का वापरतो, सोशल मीडिया?

>तरुणांचा नवा ‘आवाज’
 
सोशल मीडिया आपल्या आजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील पुण्यासह इतर शहरात फेसबुकवरील पोस्टमुळे झालेले दंगे या माध्यमामध्ये असणारं विखारी पोटेन्शिअल दाखवणारं होतं. अर्थात कोणताही मीडिया हा काही चांगला किंवा वाईट नसतो. 
जसे यंत्नाला गुणावगुण नसतात तसंच माध्यमांनाही मूलत: गुणावगुण नसतात. व्यक्ती आणि समूह त्याचा वापर कसा करतात यावर सारे अवलंबून असते. आणि म्हणूनच आपल्या सर्वांची, विशेषत: तरुण मुलांची जबाबदारी अधिक वाढते. सोशल मीडियाचा परिणाम आज जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करतोय. म्हणून तर त्याचा जबाबदारीनंच वापर करायला हवा. 
   सोशल मीडिया ही टर्म साधारण गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून चर्चेत आली आहे. ढोबळमानाने इंटरनेटबेस्ड कम्युनिकेशन करण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर केला जातो त्याला सोशल मीडिया असे म्हणतात. विकीपिडीयासारखे अनेकांनी मिळून केलेले प्रकल्प, ट्विटर, टम्बलर सारख्या ब्लॉग/ मायक्र ो ब्लॉग कम्युनिटीज, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स यांचा समावेश होतो. या सार्‍या सोशल मीडियामुळे नव्याने उपलब्ध झालेले व्यासपीठ आपल्या स्वातंत्र्याचे, अभिव्यक्तीचे मुक्त आकाश आहे. पूर्वीच्या पारंपरिक माध्यमांवर असणारी मूठभरांची मक्तेदारी यामुळे मोडीत निघाली आणि खर्‍या अर्थाने माध्यमांचे लोकशाहीकरण झालेले आहे. त्यामुळे ‘एवरीबडी इज मीडिया’ हे आता प्रत्यक्षात आले आहे. आज प्रत्येकजण सिटीझन जरनॅलिस्ट झालेला आहे; पण हाती आलेल्या माध्यमाचा कसा वापर करायचा याचे संयत आणि सम्यक भान आपल्याला आलेले नाही असे वाटते. 
त्यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. सोशल मीडियाला दुय्यम समजण्याची आवश्यकता नाही आणि त्याच वेळी त्याला अवास्तव महत्त्व देण्याचीही गरज नाही. 
   सोशल मीडियामुळे ज्या समूहांना आजवर आवाज नव्हता त्यांना एक मोठा आउटलेट या निमित्ताने मिळाला. संवाद अधिक वेगात सहज होऊ लागला; पण त्याच वेळी ज्या आशयाचं वहन या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आहे त्याच्या अधिकृततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. नेमके सत्य काय, याविषयी संभ्रम निर्माण झाले. यातून व्हच्र्युअल मीडिया अधिकाधिक व्हच्र्युअल बनण्याची शक्यता बळावली. 
  मी जर हा सोशल मीडिया वापरत असेल तर निदान मी माझ्यापुरते तरी काही पत्थ्यं पाळतो. 
आपण जी माहिती प्रसारित करत आहोत त्यातली सत्यासत्यता पडताळून पाहून मगच ती शेअर करायला हवी. अनेकदा वैयक्तिक हेवे-दावे किंवा व्यक्तिकेंद्रित चर्चा होतात. याऐवजी मूलभूत विषयाबाबत, कळीच्या मुद्दय़ांबाबत जाऊ चर्चा व्हायला हवी. सतत स्वत:च्याच प्रेमात आकंठ बुडालेल्या संवादापेक्षा, सनसनाटीपेक्षा ज्यातून काहीतरी हाती लागेल, सामाजिक शहाणपण वाढेल असा संवाद वाढायला हवा. 
‘एवरीबडी इज मीडिया’ आणि ‘मीडिया इज मेसेज’ ही आजच्या मास कम्युनिकेशनची दोन सूत्रं लक्षात घेऊन संवाद करणं ही सुजाण नागरिकत्वाची पूर्वअट आहे. लोकशाही व्यवस्थेतला सोशल मीडिया नावाचा पाचवा स्तंभ म्हणूनच मला अधिक महत्त्वाचा वाटतो आहे.
- श्रीरंजन आवटे सोशल मीडिया ‘जागरूकतेने’ वापरणारा, एक तरुण दोस्त

Web Title: Why do I use social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.