कोरोना काळात तरुणांवर का चढली  के पॉपची जादुई झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 07:58 AM2020-12-03T07:58:14+5:302020-12-03T08:00:21+5:30

सध्या तरुणांच्या जगात कोरिअन पाॅपची दिवानगी आहे. नेमकं कशानं लागतं ते वेड?

Why did the magical zing of pop pop up on young people during the Corona era? | कोरोना काळात तरुणांवर का चढली  के पॉपची जादुई झिंग

कोरोना काळात तरुणांवर का चढली  के पॉपची जादुई झिंग

Next

-इशिता मराठे

मी दहावीत असताना पहिल्यांदा BTSचं एक गाणं ऐकलं. तेव्हापासून मला के पॉपचं चक्क वेड लागलं. के पॉप एक कृष्णविवरच आहे असं म्हणतात. एकदा त्याच्या तोंडाशी गेलं की आत ओढलं जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही.

नेमकं कोरिअन कल्चरमध्ये असं काय आहे? इतकी मोहात पाडणारी आणि पार खिळवून ठेवणारी संस्कृती इतकी वर्ष कुठे होती? ती आपल्या नजरेत का नाही आली? जेव्हा मी नुकतीच या नवीन जगाची ओळख करून घेत होते तेव्हा मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि अगदी हेवाच वाटला. आशिया खंडातलेच हे दोन देश. कोरिया आणि भारत. तरीही संस्कृती, संकल्पना, समजुतींमध्ये जमीन अस्मानाचा फरक. काही चांगले फरक, काही वाईट.

मुलांनी मेकअप करणं ही संकल्पना तिथे इतकी रूळली आहे की त्यात आता कुणाला काही वावगं वाटत नाही. कोरिअन मुलं मेकअप करतात आणि त्याचा अभिमानही बाळगतात. फॅशन आणि मेकअपसाठी असलेलं त्यांचं प्रेम खुलेपणानं व्यक्त करायला त्यांना संकोच वाटत नाही. या लॉकडाऊनच्या काळात के पॉप, कोरिअन ड्रामा, फूड, ब्यूटी प्रॉडक्ट‌्स यांच्या प्रसिद्धीत झपाट्यानं वाढ झाली. बॉलिवूडचे सितारे BTS, Blackpink या कोरिअन ब्रॅण्ड‌्सच्या गाण्यांवर नाचू लागले. टीव्हीवर कोरिअन कॉस्मेटिक्सच्या जाहिराती झळकू लागल्या. सॅमसंगनं BTS सोबत एक मोठी डिजिटल कॅम्पेन चालवली. यू-ट्यूब आणि स्पॉटिफायवर के पॉप बॅण्ड्सने अनेक रेकॉर्ड‌्स मोडले. या के पॉप आर्टिस्ट‌्सचे फॅन क्लब्स तयार झाले. संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान या चाहत्यांनी सोशल मीडियावर मीम्स आणि एडिट‌्स पोस्ट करून या नव्या जगाला आणखी लोकप्रिय केलं. आता लाखोंच्या संख्येनं भारतीय चाहते आपल्या आवडीच्या बॅण्डची भारतात कॉन्सर्ट टूर करण्याची वाट पाहतात. मीही त्यांच्यातीलच एक. भाषेचा अडसर असूनही.

यावर्षी मार्च ते जुलै या काळात डुओलिंगो या ॲपवर कोरिअन भाषा शिकणाऱ्या भारतीयांची संख्या २५६ टक्क्यांनी वाढली आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री आता फक्त बॉलिवूड आणि हॉलिवूडपुरती मर्यादित राहिलेली नाही. कोरिअन कलाकारांचा आता स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मस‌्वर मोठा प्रभाव आहे. नेटफ्लिक्सवर ‘It’s okay to not be okay’ आणि ‘Light up the sky’ यासारख्या सिरीज आणि डॉक्युमेंटरी सुपरहिट झाल्या. Mx player या ॲपवर अनेक कोरिअन मूव्हीज डब करून पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. टिव‌्टरवर दररोज के पॉप संबंधित हॅशटॅगसने ट्रेंडिंग पेज भरलेलं असतं. फॅन क्लब्जची आपली वेगळीच दुनिया असते. त्यांना एक कलाप्रेमी समाज म्हणून स्वत:ची ओळख असते. त्यांचा स्वतंत्र झेंडा, नाव, फॅनचॅट, चिन्ह आणि रंगही ठरवलेला असतो. कॉन्सर्टच्या वेळी जेव्हा चाहत्यांनी स्टेडिअम गच्च भरलेलं असतं आणि सगळे एकाच सुरात मनापासून गात असतात, तेव्हा त्या दृश्यानं मन भरून येतं. या आर्टिस्टशी एका अर्थानं इमोशनल अटॅचमेण्ट होते.

कोरिअन कण्टेण्टसाठी आता यू-ट्यूबवर कित्येक चॅनल्स केवळ सबटायटल्स देण्याचं काम करतात. त्यामुळे भाषा जरी समजत नसली तरी भावना मात्र पोहोचते. खरं सांगायचं तर सुरुवातीला बरेच के पॉप स्टार्ससारखे दिसतात. पण तासन‌्तास त्यांचे इंटरव्ह्यू आणि म्युझिक व्हिडिओ पाहून आता प्रत्येकाचं नाव, केसांचा रंग, वय आणि उंची पाठ झाली आहे. रिपिटवर ऐकल्याने पूर्ण अल्बमसुद्धा तोंडपाठ आहे. हेच काय, कित्येक गाण्यांची कोरिओग्राफीसुद्धा शिकून झाली. डान्स हा के पॉपचा अविभाज्य भाग आहे. कॅची म्युझिक आणि खिळवून ठेवणारी व्हिडिओग्राफी यामुळे कोरिअन पॉप मनं जिंकतंय.

कोरोनाकाळात कित्येकांना BTS, Blackpink अशा बॅण्ड‌्सने मनसोक्त मनोरंजन दिलं. गाणी, डॉक्युसिरीज, व्हॉइस पॉडकास्ट, ब्लॉग, बिहांइड द सीन्स, रिॲलिटी शोज, कॉन्सर्ट मूव्हीज, इंटरव्ह्यु अशा प्रकारात पुरेपूर कण्टेण्ट दिलं. नावं माहीत करून घेणं, के ड्रामाचे सबटायटल्स वाचणं, मीम्सवर हसणं, टि‌्वटर पेज बघणं अशा नाना कारणांनी मागील काही महिन्यात भारतीयांनी कोरिअन कल्चरशी स्वत:ला जोडून घेतलंय. आपल्या सवयीच्या, रूळलेल्या कलाप्रकाराव्यतिरिक्त आपण एक वेगळं जग एक्स्प्लोर करतोय..

(कोरिअन पॉपची फॅन असलेली इशिता बारावीत शिकते.)

ishitamarathe1@gmail.com

Web Title: Why did the magical zing of pop pop up on young people during the Corona era?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.