प्रेमात ‘नकार’ मिळालेले पुरुष इतके क्रूर का होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 05:57 PM2020-02-14T17:57:53+5:302020-02-14T18:00:08+5:30

नार्सिसिस्ट अर्थात आत्मपूजक पुरु ष जेव्हा एखाद्या स्रीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला फक्त ‘ती’ हवी असते. एखादी बाइक, लेदर जॅकेट हवं तशी ‘ती’ हवी. त्यांना ‘ती’ मिळाली नाही, तर ते तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करतात. त्यात आपलं काही चुकलं, असंही त्यांना वाटत नाही. पुरुष हे असं टोकाचं का वागतात?

why are male become so violent & cruel in love & breakup? | प्रेमात ‘नकार’ मिळालेले पुरुष इतके क्रूर का होतात?

प्रेमात ‘नकार’ मिळालेले पुरुष इतके क्रूर का होतात?

Next
ठळक मुद्देपुरु ष क्रूर होतो, तो का?

-राहुल बनसोडे

गोष्ट तशी थोडी जुनी, पण फार जुनी नाही. कुठल्याशा लहानशा शहरात, कुठलीशी मुलींची शाळा, कुठलीशी मुलांची आणखी वेगळी शाळा. वयाची चौदा-पंधरा वर्षे होईर्पयत या वेगवेगळ्या शाळेत शिकणार्‍या मुलींना मुलगा कसा असतो त्याबद्दल फारसे काही माहिती नाही, मुले तर मुलींशी बोलायलाही कचरतात. मग दहावीचे वर्ष सुरू होते आणि एव्हाना एकमेकांबद्दल काही विशेष माहिती नसलेली ही मुले एकाच कोचिंग क्लासमध्ये एकत्र येतात. क्लासमध्येही मुले सर्व एकीकडे बसतात मुली सर्व दुसर्‍या बाजूला. स्री आणि पुरु ष अशी स्पष्ट विभागणी असलेल्या त्या क्लासमधली कुठलीही मुलगी कुठल्याही मुलाशी कधीच बोललेली नसते, ती नुसती बोलली जरी तरी काय होईल याची कल्पना तिला आहे. क्लासमध्ये सतरंज्यावर येऊन बसलेल्या एकूणएक मुलाला त्या क्लासच्या रूममध्ये मुलीही आहेत याची जाणीव असतेच; पण ती तिथेच. शिक्षकांना यायला कधी उशीर झाला तर चुकून मुलं मुलींकडे पाहतात, मुली मुलांकडे पाठ करून त्यांच्या गप्पाटप्पांमध्ये रममाण आणि त्यांचा कलकलाट चालू. चुकून एक मुलगी मुलांकडे चोरून पाहते. त्या मुलांमधला एकचण आपल्याकडेच पाहतोय याची तिला जाणीव होते. एकाचवेळी कुतूहल, त्रास, अस्वस्थता, आश्चर्य आणि किंचित आनंदही. या मिश्र भावना एकदमच कुठून येतात माहिती नाही. ती त्याच्याकडे त्या दिवशी दुर्लक्ष करते, नंतर कधीतरी परत एकदा सरांना उशीर होतो आणि क्लासमधल्या गप्पाटप्पा आणि गोंधळ पुन्हा सुरू होतो. कुतूहलाने ती पुन्हा एकदा त्या मुलाकडे पाहते. यावेळीही तो तिच्याकडेच पाहत असतो. हा आपल्याकडेच पाहतो आहे याची तिला पक्की खात्री पटते. मध्यमवर्गीय संस्कार, आई-वडिलांचा धाक, इतर मैत्रिणींनी आणलेली नैतिक बंधनं अशा प्रचंड दडपणाखाली असलेल्या त्या मुलीला तिच्याकडे पाहणार्‍या या मुलाच्या भावनेला नेमका काय प्रतिसाद द्यावा हे माहिती नसते. शिवाय तो तिच्याकडे पाहतो हे तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितल्यावर ती आणखीनच अस्वस्थ होते. याचे पाहणे बंद व्हावे म्हणून मग एक दिवस ती आणि तिच्या मैत्रिणी एकत्रितरीत्या त्याच्याकडे एकटक पाहतात. तो थोडावेळ गोंधळतो आणि पाहणं थांबवतो, एक-दोन दिवसानंतर त्याचे तिच्याकडे एकटक पाहणे पुन्हा सुरू होते. या प्रकाराचा तिला त्रास व्हायला लागतो; पण तो फक्त पाहतोच आहे अजून तर काही करीत नाही ना याकारणाने ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते, किमान दुर्लक्ष करते आहे असे स्वतर्‍ला तरी समजावते; पण हे तिचे तिलाच फसवणे आहे हे तिला माहिती असते. तो मुलगा मात्र तिच्याकडे पाहणे बंद करीत नाही; पण प्रत्यक्ष तिच्यासमोर जाऊन तिच्याशी काही बोलण्याचीही त्याची हिंमत होत नाही. बोलणार तरी काय आणि कसे? 
दिवस सरतात आणि शाळा संपते, दोघे पास होतात आणि एकाच कॉलेजात अ‍ॅॅडमिशन घेतात. तरु णपणाची नवनवी स्वप्ने पाहतात. मुलात अजूनही हिंमत येत नाही; पण तो तिच्याकडे पाहणेही थांबवत नाही, इथे कोचिंग क्लासपेक्षा थोडी जास्त मुभा असल्याने तो तिच्या आसपास घुटमळू लागतो, क्वचित ती घरी जायला निघाली म्हणजे तिचा पाठलाग करतो, तिला ऐकू जाईल अशा आवाजात मित्रांशी तिलाच उद्देशून बोलतो. हळूहळू त्या मुलीला हे असह्य होऊ लागते, त्यात मैत्रिणी हा त्रास घालविण्याचे वेगवेगळे सल्ले देतात. त्यातला महत्त्वाचा एक सल्ला की सरळ त्याच्याशी बोल आणि हे असे पुन्हा केले तर परिणाम वाइट होतील असे सांग. मुलीतही बोलण्याची हिंमत नसते, खासकरून तेव्हा जेव्हा तिला तो मुलगा त्रास देतोय. दिवस असेच जात राहातात आणि त्या मुलाचे तिला छेडीत राहाणे थांबत नाही. मग एक दिवस सगळचं असह्य झाल्याने ती हा प्रकार भावाला सांगते. भाऊही मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला, थोडासा भित्रट, तो त्याच्या जिमला जाणार्‍या एका मित्राची मदत मागतो. दोघे एकदिवस कॉलेजला येतात, तो मुलगा घोळक्यात उभा असतो, ती मुलगी आपल्या भावाला लांबूनच त्या मुलाला दाखवून देते, मग भाऊ आणि त्याचा मित्र त्या मुलाकडे जातात आणि त्याला मारहाण सुरू करतात, मारीत मारीत त्याला त्या मुलीकडे घेऊन जातात, तिच्या पाया पडायला लावतात आणि तिला ताई म्हणायला लावतात. मुलीला हे इथपर्यंत जाईल असे अजिबात अपेक्षित नसते, तो मुलगा पाया पडताना ती पाय मागे सरकवते, स्रीसुलभ लज्जेने म्हणा किंवा मग झाल्या प्रकाराच्या अपराधी भावनेतून म्हणा. त्या संध्याकाळी तिचा त्रास थांबतो, मुलगा नंतर तिच्या वाटय़ाला जात नाही, तो कॉलेजला जाणेही बंद करतो. मुलगी शिक्षणात स्थिरावते, झाला प्रकार उभ्या कॉलेजने पाहिलेला असल्याने तिला परत कुणी छेडण्याची हिंमतही करीत नाही. 
यथावकाश कॉलेजही संपते आणि पोस्टग्रॅज्युएशन सुरू होते. मुलगा परत कॉलेजला अवतरतो. यावेळी त्याच्या मनावरच्या जखमांवर खपली धरलेली असली तरी झाला प्रकार तो विसरलेला नसतो; पण यावेळी वेगळेच काही होते. एवढय़ा पाच-सहा वर्षात मुले-मुली बरीच धीट झालेली असतात, त्यांच्यामध्ये संवाद सुरू झालेले असतात. क्वचित प्रेमप्रकरणेही सुरू झालेली असतात. तो परतल्यानंतरही तिच्याकडे अधूनमधून पाहणे बंद करीत नाही; पण यावेळी त्या पाहण्यात प्रचंड करु णा असते, इतकी की तिने त्याच्याशी डोळा भिडवला तर तिला अपराधीपणाची जाणीव व्हावी. ही नजरानजर काही वेळाच होते आणि त्या मुलाला जरा चांगलीच गर्लफ्रेंड मिळते. त्या गर्लफ्रेंडवर त्याचे किती प्रेम आहे किंवा मग त्या गर्लफ्रेंडचे त्याच्यावर किती प्रेम आहे हा हिशेब वेगळा; पण या दोघांचे नाते तिला कळते, ते दोघे वरचेवर तिला दिसत राहातात, कधीकाळी हिच्याशी बोलायला घाबरणारा तो आता आपल्या गर्लफ्रेंडचा हातात हात घेऊन सबंध कॅम्पसमध्ये फिरत असतो. तिने त्याला कधीकाळी मार खाऊ घालून जितके दुखावले असावे त्यापेक्षा जास्त तो तिला दुखावतो.



ही कथा तशी काल्पनिक आणि तिचे शेवटचे वळणही. तसे पाहता सोयीचे आणि तरीही मने दुखावलेले; पण कथा कित्येकदा या वळणाने जात नाही. तो मुलगा तिच्या भावाकडून सहज मार खाऊन घेत नाही, इनफॅक्ट मार खाणे तर जाऊद्या, त्याच्या अंगाला हात लावणेही त्या मुलीच्या भावाला शक्य नसते. भाऊ त्या मुलाशी जरा कडक आवाजात बोलून पाहतो, पोलिसांची धमकी देतो, वेळप्रसंगी टोकाची हिंसा करण्याचाही त्याचा उद्देश असतो; पण याचा काहीएक उपयोग होत नाही. उलट तो मुलगा आणखी धीट होत जातो. तिचा पाठलाग करता करता तिला रस्त्यात अडवू लागतो, त्या मुलीच्या घरी ब्लँक कॉल्स करतो, सतत तिला रस्त्यात गाठून तिच्याशी संवाद करू पाहतो. या ना त्या मार्गाने जमत नसेल तर ती आपल्याला घाबरून वश होईल असा त्याचा प्रयत्न. प्रेम असे नसते हे तिचे त्याला सांगणे, शहाणपणा शिकवू नको अशी त्याची अरेरावी. या एका क्षणाला त्या मुलीला जीव द्यावासा वाटू शकतो. घरच्यांना आणखी काही सांगावे तर कॉलेज बंद होण्याची भीती असते, तिच्या अशा भेदरल्या अवस्थेमुळे ती व्हल्नरेबल होते. घरातले पुरु ष तिला समजून घेत नाहीत किंवा हतबल असतात, कॉलेजातले पुरु ष तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतात, एखाद्या मित्राची मदत मागावी तर तोही त्याचा अर्थ वेगळाच काढतो आणि कित्येकदा जवळच्या पोलीस ठाण्यातला पुरु ष त्या मुलाने अगोदरच पटवून ठेवलेला असतो. 
मग त्या मुलीचा त्रास संपता संपत नाही आणि गोष्टीचा शेवट काही वेगळाच होतो. त्या मुलीचे शिक्षण थांबवून तातडीने तिचे लग्न लावून तिने कायमचे दुसर्‍या शहरात जाणे किंवा त्या मुलाच्या आई-वडिलांनी त्याला कुठे दुसरीकडे पाठवणे हे पर्याय या गोष्टीचा शेवट असू शकतात; पण सगळ्या गोष्टी इथेच येऊन संपतात असेही नाही.
***
 त्या मुलाच्या त्रासाला कंटाळून त्या मुलीने आत्महत्या करणे. त्या मुलीचा नकार पचवता न आल्याने त्या मुलाने आत्महत्या करणे, त्या मुलीच्या घरच्यांनी टोकाचे पाऊल उचलून त्या मुलाची हत्या करणे किंवा मग त्या मुलाने टोकाचे पाऊल उचलून त्या मुलीची हत्या करणे हे काही भयंकर पर्याय या गोष्टीचा भयानक शेवट करतात. मुलाने केलेल्या आत्महत्येची बातमी होत नाही, झालीच तर त्याच्या हत्येचे कारण पूर्ववैमनस्य असे दिले जाते. मुलीच्या हत्येची वा तिच्या हल्ल्यावरची बातमी होतेच होते आणि त्याचे कारण तो मुलगा तिला त्रास देत होता असेच दिले जाते. 
इथे मुलाच्या हत्येची बातमी आणि मुलीच्या हत्येची वा तिच्यावरच्या हल्ल्याच्या बातमीत फरक असतो. का असतो? तर त्याचे कारण तसे सोपे आहे. या सगळ्या प्रकरणाची सुरु वात ही त्या मुलापासून सुरू होते. त्याला तिचा नकार पचवता येत नाही. तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडतो, एखादा पुरु ष एखाद्या स्रीच्या एकतर्फी प्रेमात पडण्याची शक्यता स्रीने एकतर्फी प्रेमात पडण्याच्या शक्यतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त असते. एकतर्फी प्रेम दरवेळी त्रासदायकच असते असे नाही. अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यात एकतर्फी प्रेमात पडलेला पुरु ष त्या स्रीला कुठलाही त्रास देत नाही, किंबहुना तिच्यासाठी तो स्वतर्‍ कुठलाही त्रास सहन करायला तयार असतो; पण सर्व पुरु ष असेच असतात असे नाही. काही पुरु षांचे स्वतर्‍वर सर्वाधिक प्रेम असते, असे नार्सिसिस्ट पुरु ष जेव्हा एखाद्या स्रीच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांची प्रेमाची व्याख्या इतर उदात्त व्याख्यांपेक्षा फार वेगळी असते. अशा पुरु षांना ती स्री फक्त एक वस्तू म्हणून हवी असते. अगदी आवडत्या बाइकप्रमाणे किंवा आवडत्या लेदर जॅकेटप्रमाणे ती स्रीदेखील आपल्या वापराची वस्तू आहे असा समज त्यांच्या मेंदूने करून घेतलेला असतो. मग बाइक किंवा लेदर जॅकेट जितक्या सहजपणे मिळते तितक्या सहजपणे ही स्री का मिळत नाहीये हे त्याला समजत नाही. प्रेम मिळविण्यासाठी इतर काही पात्रता असव्या लागतात, समोरच्यालाही आपल्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी वाटायला हवी असते, तिलाही प्रेम व्हायला हवे असते असे त्यांना अजिबात वाटत नाही. किंबहुना इतरांना काही भावना असतात हे समजावून घेण्याचीच नार्सिसिस्ट माणसांमध्ये क्षमता नसते. एरव्ही समाज अशा लोकांना निकरट समजतो; पण अशी निकरट माणसे प्रेमात पडली म्हणजे ती ज्या कुणाच्या प्रेमात पडली आहेत त्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहात नाहीत. आणि अशी माणसे उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना आपण काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही. ते खुशाल दुसर्‍या  शिकारीचा शोध घेणेही सुरू करतात. 
***
दुबळ्या पुरु षाचे एकतर्फी प्रेम हे त्याला स्वतर्‍ला आणि कदाचित तो प्रेमात पडतो त्या स्रीला थोडेफार दुखावते, त्यापलीकडे कुणाचे काही नुकसान होत नाही. नार्सिसिस्ट पुरु षाचे एकतर्फी प्रेम हे ती स्री न मिळाल्यास कुठल्याही टोकार्पयत जाते, असा पुरु ष किमान सभ्यतेचे, स्रीदाक्षिण्याचे, संवादाचे कुठलेही नियम पाळू इच्छित नाही. पुढे त्याला समाजाचा, पोलिसांचा वा देशाच्या कायद्याचाही धाक नसतो. अशा मुलांच्या संगोपणात त्याच्या पालकांनी काय काय घोडचुका केल्या आहेत ते दिसून तर येते; पण त्याचे पालकही त्याला विशेष शिस्त लावू शकत नाही. आपल्याप्रमाणेच समोरच्यांनाही भावना असतात, भावनिक गरजा असतात आणि प्रेम हे दोन्ही बाजूंनी करायची गोष्ट आहे हे सत्य ज्यांना सांगूनही समजत नाही असे लोक मानवी उत्क्र ांतीत गेल्या तीस हजार वर्षात झालेल्या प्रगतीत तयार झालेले नीती-नियम आणि कायदे विसरतात. सत्तर हजार वर्षापासून सुरू असलेला सामाजिक व्यवहारही विसरतात आणि थेट दोन लाख वर्षे मागे जात चिम्पॅन्झी आणि बबून माकडाच्या प्रजातींसारखे वागतात. अशा पुरु षाला पुरु ष न म्हणता फक्त नर म्हणता येईल आणि तो इतर वानरांच्या प्रजातीतल्या नरासारखाच वागतो. अशा नराने एखाद्या स्रीवर अत्याचार केल्यानंतर त्याला ठेचून वा गोळ्या घालून मारणारेही पुरु ष नसतात, नरच असतात.
अशा नरांना काबूत ठेवण्यासाठी मोठय़ा शहरामध्ये आणि विकसित समाजामध्ये बरेच कायदे उपलब्ध आहेत; पण लहानसहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये आजही परिस्थिती बदललेली नाही. एकतर्फी प्रेमातून होणार्‍या हत्यांकडे समाज अनेक पद्धतीने पाहतो. पण माणसाच्या दोन लाख वर्षाच्या इतिहासाच्या नजरेतून पाहिल्यास हाती येणारी जैविक आणि मानसिक तथ्ये काही वेगळीच गोष्ट सांगतात. ही गोष्ट कधी बदलेल याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही.

ओ.एल.डी. - ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर 
मागे लागण्यापासून बदला घेण्यार्पयतचा प्रवास

* ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर या आजारात एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीबद्दल प्रचंड प्रेम निर्माण होते आणि तो प्रेमाने पुरता झपाटून गेल्यासारखा वागतो. नाते दोन्ही बाजूंनी असल्यास आणि या नात्यातला पुरु ष झपाटलेला असल्यास तो आपल्या गर्लफ्रेंडकडे कुणी पाहिले तरी त्याच्याशी पंगा घेतो, गर्लफ्रेंडला कुणी काही बोलले तर त्याची हड्डीपसली एक करतो, इवल्याशा कारणासाठी गर्लफ्रेंडलाही सतत दटावत राहातो. 
* अलीकडे आलेल्या कबीर सिंग या चित्रपटाचा नायक अशा व्यक्तिमत्त्वांच्या फार जवळ जाणारा आहे. या सिनेमाचा शेवट काहींना आवडला असला तरी त्यातल्या नायकाच्या वागण्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणारे नाही. 
*  ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर हा आजार पुरु षाला एकतर्फी प्रेमातून उद्भवला असल्यास तो जिच्या प्रेमात पडला आहे त्या स्रीच्या सदैव मागावर असतो. तिला पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, तिच्याशी बोलण्यासाठी, तिच्या सहवासासाठी तो सदैव आतुर असतो. ती स्री नजरेसमोर नसल्यास तिच्या घराबाहेर चकरा मारणे, तिला सतत फोन करणे, फेसबुकवर तिचे फोटो न्याहळत बसणे, फेक प्रोफाइलवरून तिला त्रास देणे, व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करीत राहाणे अशा अनेक कृती त्याच्या हातून घडत असतात. 
* 2003 साली आलेला तेरे नाम हा सिनेमा. एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह झालेल्या नायकाची कहाणी आहे. त्याच्या शेवटाला नायिकेला नायकाचे प्रेम कळून चुकते असे दाखवले आहे; वास्तव जीवनात मात्न असे कधीही होत नाही. एकदा एखादा पुरु ष एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह झाला की त्याच्यापासून सुटका मिळवणे सहजशक्य नसते आणि त्याच्या वागणुकीचा इतिहास पाहता त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणे अगदी नाइलाजाने ही शक्य नसते. अशा परिस्थितीत स्रीचे दैनंदिन जीवन त्रासाचे होते आणि कित्येकदा तिचे सार्वजनिक आयुष्यच धोक्यात येऊ शकते. 
*  नात्यांमध्ये स्रियादेखील ऑब्सेसिव्ह असू शकतात; पण त्यांचे हे ऑब्सेशन बरेचदा नैसर्गिक पातळीवर असते आणि काही अपवाद वगळल्यास त्यातून टोकाची परिस्थिती निर्माण होत नाही.
* एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह होणार्‍या स्रियांचे प्रमाण पुरु षांपेक्षा खूप कमी आहे. शिवाय एखादी स्री आपल्या एकतर्फी प्रेमात पडली आहे ही बाब बर्‍याच पुरु षांना सुखावणारी असते; पण ही सुरु वातीची सुखावणारी बाब त्या पुरु षाची नोकरी जाईर्पयत, त्याचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होईर्पयत आणि त्याचे संपूर्ण करिअर संपण्यार्पयत जाऊ शकते. 
*****
..व्हेन इट हर्ट्स टू मच!
तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करत असलात, तर..

* ऑब्सेसिव्ह लव्ह - व्हेन इट हर्ट्स टू मच टू लेट गो या पुस्तकाच्या लेखिका सुझन फॉरवार्ड यांच्या मते, राग आणि प्रेम या दोन्ही गोष्टी परस्परांच्या विरु द्ध असल्यातरी ऑब्सेसिव्ह प्रेमात त्या एकत्र नांदत असतात. असा माणूस प्रेम व्यक्त करतोय की राग व्यक्त करतोय हे कळायला मार्ग नसतो आणि अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या मागे लागण्यापासून तिचा बदला घेण्यापर्यंत ऑब्सेसिव्ह व्यक्ती येऊन पोहोचते. 
* सतत साचत गेलेले प्रेम आणि  सतत साचत राहिलेल्या रागाची परिणीती मग त्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार करण्यात, शारीरीक हानी करण्यात आणि वेळप्रसंगी थेट हत्या करण्यात होते. ही टोकाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी ऑब्सेसिव्ह माणसांविरु द्ध कायदेशीर तक्र ार करून त्याला अटकाव केला जाऊ शकतो; पण कित्येकदा टोकाची परिस्थिती येईपर्यंत त्या व्यक्तीने कायदा मोडलेला नसतो वा त्याला शिक्षा करण्याइतपत व्यवस्था सक्षम नसते.
*ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर ही संज्ञा मानसशास्रज्ञांनी मांडली असली तरी मानसिक उपचारांमध्ये तिला अद्याप अधिकृतता देण्यात आलेली नाही. 
* एखाद्याला ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर झालेला असल्यास त्याने सर्वप्रथम एकतर्फी प्रेमात पडलेल्या माणसांपासून दूर जाण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत, हे अवघड आहे; पण अशक्य अजिबात नाही. 
* केवळ एक व्यक्ती आपल्यावर प्रेम करीत नाही म्हणून कुणीच आपल्यावर कधीच प्रेम केलेले नाही अशा भ्रमात कधीही राहू नये. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला मिळवता आली नाही आणि तिला मिळविण्यासाठी आपण काहीही केले असते असे विचार मनाशी करू नये कारण हे ‘जे काहीही करणे’ होते त्यातून तिला जसा त्रास झाला असता हे लक्षात ठेवलेले बरे.
*  आपण जिच्या प्रेमात होतो तिच्याशी बदला घेण्याचा सर्वात सुखकर आणि गोड मार्ग असतो तो तिच्यापेक्षाही चांगल्या व्यक्तीशी नाते जुळवून ते टिकवून दाखवण्याचा. मानसशास्र ओ.एल.डी.च्या अवस्थेला जोर्पयत अधिकृत मान्यता देत नाही आणि त्यावर औषध शोधून काढत नाही तोपर्यंत हा एकच मार्ग आहे, तारतम्याने वागण्याचा!
 


(लेखक मानववंशशास्र आणि समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: why are male become so violent & cruel in love & breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.